अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांची कार ते लेटरबॉम्ब; २७ दिवसांत काय काय घडलं?

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांची कार ते लेटरबॉम्ब; २७ दिवसांत काय काय घडलं?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला. या लेटरबॉम्बनंतर  विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर आंदोलनाची पवित्रा घेतली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकापासून सुरु झालेलं प्रकरण नंतर मनसुख हिरण, सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापासून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत पोहचलं आहे. २५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत म्हणजेच २७ दिवसांमध्ये घडलेला प्रकार एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे भासत आहे. २७ दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्याचा एकूणच घटनाक्रम जाणून घेऊयात....

२५ फेब्रुवारी २०२१ -
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्यापासून  फक्त ५०० मीटर अंतरावर संशयित गाडी आढळली होती.  संबंधित गाडीमध्ये जिलेटिनच्या २० काड्या आणि धमकीचं पत्र होतं. 

पत्रात काय? -
- ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

गृहमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया -
- मकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राईम ब्रँच करत आहे. लवकरच सत्य माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

२६ फेब्रुवारी २०२१ -
- अंबानींच्या घराजवळ आढळलेली स्कॉर्पिओ गाडी सर्वात आधी सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याने बघितली. काही काळ स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाची आणि अंबानींच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची चौकशी आधिकारी म्हणून वाझे यांची नेमणूक.  

- मनसुख हिरेन हे या कारचे मालक होते. त्यानंतर ते मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते. कार चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली होती. 

२७ फेब्रुवारी २०२१ -
- अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्कॉर्पिओ कार ठाण्यातील ऑटोमोबाइल व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या ताब्यातून १७ फेब्रुवारीला चोरी, विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची माहिती उघड.

२८ फेब्रुवारी २०२१ -
- एनआयए, एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून मनसुख यांची चौकशी

१ मार्च २०२१ - 
- तपास आधिकारी सचिन वाझे आणि अंबानीच्या घराबाहेर सापडेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन एकमेंकाना पहिल्यापासून ओळखत होते. 

- सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यातील संबंधाचा खुलासा झाला. त्यानंतर अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या गाडी प्रकरणाचा तपासकार्य वाझे यांच्याकडून काढून घेतला.  

विरोधकांनी उपस्थित केला प्रश्न -
- मनसुख हिरेन यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती कोण? ही गाडी जिथे सापडली, तिथे लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली.

विधानसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं, काय म्हणाले फडणवीस -
सचिन वाझे यांचं घर ठाण्यात, जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातील, इतकंच नाही जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना IO म्हणजे तपास अधिकारी नेमलं.

३ मार्च २०२१ – 
तपास पुढे सरकत नसल्याने सहायक आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे तपास सोपवला

४ मार्च २०२१ -
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकासह आढळलेल्या कारचे मालक मनसूख हिरेन बेपत्ता झाले. तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदर येथे जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते, कुटुंबाची माहिती.

५ मार्च २०२१ - 
चौकशीत सहकार्य करत असलेल्या मनसुख हिरन यांचा मृतदेह ठाणे जिल्ह्यातील रेतीबंदर येथे आढळला. घातपात असल्याचा कुटुंबाकडून संशय व्यक्त करण्यात आला.

६ मार्च २०२१ -
- हिरन यांची पत्नी विमला यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. हिरन यांच्या मृत्यूमागे वाझे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला. 

- "सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली," असा आरोप विमला यांनी केला. "२६ फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते."

- विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वाझे यांच्यावर गंभीर आरोप

-  अंबानी धमकी प्रकरण, मनसुख यांच्या ताब्यातील कारची चोरी आणि मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू या तिन्ही प्रकरणांचा तपास गृहविभागाकडून एटीएसकडे वर्ग करण्यात आला.

७ मार्च २०२१ - 
मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा हिरेन यांच्या कुटुंबियांचा संशय व्यक्त करणारा जबाब नोंदवला. तसेच एटीएसकडून अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्ह्याची नोंद

८ मार्च २०२१ -
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनचा मोठा साठा सापडला होता. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्याचं केंद्र सरकारने केलं स्पष्ट.

- एटीएसकडून मनसुख हत्या प्रकरणांमध्ये सचिन वाझे यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली.

९ मार्च २०२१ -
सीसीटीव्ही फुटेजमधये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या वापरल्याचं निष्पन्न झाले होते. यापैकी इनोव्हा गाडीच्या चालकाने आपली ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये या ड्रायव्हरचा चेहरा दिसत  नाही.

१२ मार्च २०२१ -
न्यायालयाने वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास नकार देत, पुढील सुनावणी १९ मार्च रोजी ठेवली होती. 

१३ मार्च २०२१- 
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) रात्री ११.३०च्या सुमारास मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली. एनआयएने दिवसभर वाझे यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कंबाला हिल येथील ऑफिसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे गेले होते. चौकशीनंतर रात्री अटक केली होती.

- ‘एनआयए’ने सचिन वाझे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ‘कलम २८६’ - जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल अशी कृती करणे, ‘कलम ४६५’ - खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, ‘कलम ४७३’ - दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणार्‍या बनावट कृती, ‘कलम ५०६(२)’-दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे, ‘कलम १२० ब’-गुन्हेगारी स्वरुपाच्या षड्यंत्रात सहभाग घेणे आणि ‘स्फोटक पदार्थ कायदा १९०८’ ‘कलम ४ अ, ब’-स्फोटके बाळगणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

१४ मार्च २०२१ - 
गुन्ह्याात वापरलेली इनोव्हा कार जप्त करण्यात आली. तसेच वाझे यांना २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.

१५ मार्च २०२१ -
वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. सचिन वाझेंचे दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. यापूर्वी २००३ मध्य ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबन झाले होते. 
 
१७ मार्च २०२१ - 
हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करुन त्यांना गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली.  

१९ मार्च २०२१ -

निलंबित पोलिस आधिकारी सचिन वाझे विरोधात मनसुख हिरन प्रकरणी हत्याचे पुरावे असल्याचं एटीएसनं कोर्टात सांगितलं.   

- मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३० मार्च २०२१ रोजी सुनावणी होणार असल्याचं ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुणावनीवेळी सांगितलं.  

२० मार्च २०२१ -
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारचे मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूचा तपासही मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला.  

- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांविरोधातील तक्रारीचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार आणि इतर आस्थापनांकडून महिन्याचे १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिलं होतं, असं खळबळजनक आरोप परमबीर यांनी आपल्या पत्रात केले.  

२१ मार्च २०२१ - 

- परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यातील ठाकरे सरकारला विरोधकांनी धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवाय राज्यभर आंदोलनेही केली. 

- शरद पवार यांनी या प्रकरणी लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी सावध भूमिका व्यक्त केली.

- मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे असला तरी, या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दोघांना अटक केली आहे. यात एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून, दुसरा अटक केलेला संशयित आरोपी सट्टेबाज असल्याची माहिती मिळते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com