आचारसंहितेपूर्वी झेडपीच्या नव्या शिक्षकांना नेमणुका! जाहिराती अपलोडसाठी ५ जानेवारीपर्यंत मुदत; १६ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपविण्याचे नियोजन

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीअखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांकडून वेळेत ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून ५ जानेवारीपर्यंत त्यासाठी मुदत असणार आहे.
Mantralay maharashtra
Mantralay maharashtrasakal media

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीअखेर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांकडून वेळेत ‘पवित्र’वर जाहिराती अपलोड होणे आवश्यक असून ५ जानेवारीपर्यंत त्यासाठी मुदत असणार आहे. त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन मेरिट यादीनुसार १६ फेब्रुवारीपूर्वी नेमणूका देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ५५ ते ५७ हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये २३ हजार तर नगरपरिषद, नगरपालिका व महापालिकांच्या शाळांवर पाच हजारांपर्यंत आणि खासगी अनुदानित शाळांवर २७ हजारांपर्यंत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. वित्त विभागाच्या निर्णयानुसार एकूण रिक्तपदांपैकी ८० टक्के पदभरतीस मान्यता आहे.

राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपरिषदांच्या शाळांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली तपासून घेतली आहे. त्यामुळे पदभरती वेळेत होईल, असा विश्वास शिक्षण आयुक्तांना आहे. तत्पूर्वी, २५ डिसेंबरपर्यंत आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही. आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग आता शिक्षण विभागाकडून सुरू आहे.

शिक्षकांच्या रिक्तपदांची सद्य:स्थिती

  • जिल्हा परिषदांच्या शाळा

  • २३,०००

  • खासगी अनुदानित शाळा

  • २७,०००

  • मनपा, नगरपरिषदांच्या शाळा

  • ५,०००

  • सध्या पदभरती

  • ७० टक्के

पदभरतीनंतरही राहणार ३० टक्के रिक्त

जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या ८० टक्के शिक्षक भरतीस मान्यता आहे. पण, बिंदुनामावलीवरील आक्षेप विचारात घेऊन १० टक्के पदांची भरती करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिल्याने सध्या ७० टक्केच शिक्षकांची भरती होईल. त्यामुळे आता भरतीनंतरही सात ते आठ हजार पदे रिक्तच राहणार आहेत. पण, ही भरती झाल्यावर शिक्षक भरतीचा पुढचा टप्पा कधी, यावर कोणताही अधिकारी ठोसपणे सांगत नसल्याची स्थिती आहे.

रोस्टर अंतिम असल्यास ‘माध्यमिक’चीही भरती

ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली (रोस्टर) तपासून अंतिम केले आहे. त्यांनाही शिक्षक भरती करता येणार आहे. त्यासाठी संबंधित शाळांना पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी त्या शाळांचा पर्याय निवडला, अशा तिघांना (एका जागेसाठी) त्याठिकाणी पाठविले जाणार आहे. त्यानंतर संबंधित संस्थेने त्या उमेदवारांची मुलाखत घेऊन एकाची निवड करायची आहे, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com