मराठी राजभाषा दिन : मराठी माध्यमातून 'यूपीएससी'ला सामोरे जाताना...

Marathi_Rajbhasha_Din
Marathi_Rajbhasha_Din

आज मराठी राजभाषा दिन. महाराष्ट्रासह मराठी भाषा बोलणाऱ्या-ऐकणाऱ्या जगभरातील कानाकोपऱ्यात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठी राजभाषा दिन साजरा करण्याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी यूपीएससी आणि मराठी भाषा याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

गेल्या काही वर्षांपासून यूपीएससी ही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आणि त्यातही मराठी माध्यमातून परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, तरीही अनेक विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून परीक्षा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

मराठी माध्यमातून परीक्षा देता येत असली तरीही इंग्रजी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेचे पेपर हे इंग्रजी किंवा हिंदी भाषेत असतात. त्यामुळे मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्यांना या दोन्ही भाषांचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. त्यामुळे जर मराठी भाषेतच यूपीएससीची प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 

त्यानंतर मुलाखतीवेळीही दुभाषीच्या मदतीने मुलाखत देण्याचा पर्याय आयोगातर्फे उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, दुभाषी योग्य प्रकारे भाषांतर करेलच, याची शक्यता तशी कमीच असते. त्याचा परिणाम आपल्या गुणांवरही होऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थी इंग्रजी भाषेला प्राधान्य देतात. मात्र, मराठी आणि तोडक्या मोडक्या इंग्रजीतून मुलाखत दिलेल्यांचीही बरीच उदाहरणे आहेत. 

महाराष्ट्रात मुंबईतील महाराष्ट्र राज्य आयएएस प्रशिक्षण केंद्र (SIAC), पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा केंद्र (सीईसी), सारथी, बार्टी आणि अनेक खाजगी संस्थांमध्ये यूपीएससी परीक्षेचे मार्गदर्शन दिले जाते. अलीकडे अनेक विद्यार्थी दहावी-बारावीपासूनच या परीक्षेच्या तयारीला सुरवात करत आहेत. तसेच शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही या परीक्षेविषयी जागरुकताही वाढीला लागली आहे.

यूपीएससी इंग्रजी माध्यमातून दिली तर उत्तीर्ण होण्याची शक्यता जास्त असते. ते एका बाबतीत बरोबरही आहे. कारण यूपीएससीचा विस्तीर्ण अभ्यासक्रम आणि मार्गदर्शन. त्यामुळे मराठी माध्यमातून परीक्षा देण्यासाठी बऱ्याचदा क्लासेसचा आधार घ्यावा लागतो. मात्र, सर्वांनाच क्लासेसची फी ही परवडणारी असेलच, असे नाही. तसेच काही विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून त्या विषयाचे आकलन होण्यासही अवघड होते. जर त्या विषयाचे आकलनच व्यवस्थित होऊ शकले नाही, तर पुढील वाटचाल खडतर होणार हे स्पष्ट आहे. पण अलीकडील काळात यामध्ये बराच फरक जाणवू लागला आहे. मराठी टक्का वाढत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या निकालांवरून दिसून येते.
- वैभव लोहकरे, अकलूज

मराठी भाषेत संदर्भ साहित्याची वाणवा आहे. मात्र, यामध्ये बराच फरक दिसू लागला आहे. अलीकडे मराठी भाषेत पुस्तके उपलब्ध होऊ लागली आहेत. यूपीएससीची प्रश्नपत्रिकाच मुळात इंग्रजी आणि हिंदी भाषेत काढली जाते. त्यामुळे तो प्रश्न समजून घेण्यासाठी मराठी विद्यार्थ्यांना अर्धी लढाई जिंकावी लागते. त्यानंतर मराठी भाषेतून स्पीडमध्ये उत्तरे लिहिणे हे आणखी एक मोठे चॅलेंज विद्यार्थ्यांपुढे असते. इंग्रजीचे स्पीड आणि मराठीचे स्पीड यामध्ये बरीच तफावत आहे. 

मराठीतून चांगल्या टेस्ट सीरिज उपलब्ध होत नाहीत, ही सध्याची सर्वात मोठी समस्या विद्यार्थ्यांपुढे आहे. सराव आणि प्रश्नपत्रिका सोडविण्याचे नियोजन या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या, तर यूपीएससी उत्तीर्ण होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. 
- उत्कर्षा झिंजाडे, पुणे

इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड असल्यामुळे बरेच विद्यार्थी मराठी माध्यम निवडतात. आणि आपली मातृभाषा असल्यामुळे आपले विचार व्यक्त करणं आणि पेपरमध्ये ते उतरवणं हे सोप्प जातं. ओघवत्या भाषेत तुम्ही उत्तरे लिहू शकता हा एक प्लस पॉईंट आहे. इंग्रजी भाषेइतकी संदर्भ साहित्ये मराठीत जर उपलब्ध झाली, तर येत्या काही वर्षातच यूपीएससीमध्ये मराठी टक्का कैक पटीने वाढलेला दिसेल.
- धनंजय भोसले, पंढरपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com