संजय राऊतच का बनलेत शिवसेनेच्या भात्यातील बाण?

Sanjay-Raut-Shivsena
Sanjay-Raut-Shivsena

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्याला आज दोन आठवड्यांहून जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री आमचाच यावरून सेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शविलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आतापर्यंत अनेक अटी-शर्तींवर भाजपसोबत निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने आता आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा दृढ निश्चय केला आहे. त्याला कारणही तसंच आहे. 'जे ठरलं होतं, तेच आम्ही मागत आहोत. काय बोलणं झालं होतं, ते मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही,' असा इशारा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिला. आणि तेव्हापासूनच सत्ता वाटपावरून भाजप-सेनेत खडाजंगी सुरू झाली होती. आणि संजय राऊत हे शिवसेनेच्या भात्यातील प्रमुख अस्र म्हणून या कालावधीत पुढे आले. का आहे त्यांना शिवसेनेत एवढे महत्त्व? आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही राऊत यांच्यावर एवढी मर्जी का? असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

युतीमध्ये असल्यामुळे मित्रपक्षबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जे बोलता येत नाही, ते संजय राऊत यांच्यामार्फत बोलले जाते, असं राजकीय वर्तुळातील अनेकजण खुलेआम सांगतात. सत्ता वाटपात स्वतः उद्धव ठाकरे हे कुठेही दिसून येत नाहीत, त्यामुळे जोपर्यंत सत्ता वाटप होत नाही, तोपर्यंत सेनेच्या रथाचे सारथ्य करण्याचे अधिकार संजय राऊत यांच्याकडे सोपवले गेले आहेत का? याची शंका येते. आता तर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची भूमिका राऊतच ठरवतील, असे जाहीर केले आहे. राऊत यांच्याकडे सेनेचे एवढे अधिकार कसे आले, त्यांना एवढं महत्त्व सेनेत का आहे? ते पाहूया.

क्राईम रिपोर्टर ते संपादक 

सध्या संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. तशी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवातही पत्रकारितेतून झाली. राऊत हे 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्लिश वृत्तपत्राच्या पुरवठा विभागात काम करत होते. त्यानंतर काही काळ मार्केटिंग विभागातही त्यांनी काम केले. पुढे लोकप्रभा सप्ताहिकापासून त्यांनी पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. लोकप्रभामध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांनी काम सुरू केले. गुन्हेगारी विश्वातील त्यांची बातमीदारी आणि त्यांची लिखाणाची पद्धत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हेरली.

1989 ला जेव्हा सामना सुरू झाला, तेव्हा अशोक पडबिद्री हे कार्यकारी संपादक होते. पडबिद्री यांच्यानंतर 1993 ला संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून रुजू झाले. क्राईम रिपोर्टर ते कार्यकारी संपादक असा प्रवास करणाऱ्या मोजक्या संपादकांपैकी राऊत हे एक. बाळासाहेब म्हणजे सामना आणि सामना म्हणजे बाळासाहेब असं समीकरण निर्माण झालं असताना, सामनाला वृत्तपत्र म्हणून नवी ओळख मिळवून देण्यात राऊत यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. फक्त राज्यातच नव्हे, तर देशभरातील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या सामनाची दखल घेतात.

बाळासाहेब ठाकरे सामनाचे अग्रलेख आपल्या ठाकरी स्टाईलमध्ये लिहायचे, त्याच स्टाईलमध्ये राऊत यांनी अग्रलेख लिहण्यास सुरवात केली. विरोधकांवर टीका करण्याची बाळासाहेबांची वेगळी अशी ठाकरे स्टाईल होती. एकीकडे चांगल्या कामाबद्दल कौतुक करताना बोचरी टीका बाळासाहेब करायचे. त्यांचीच री सध्या राऊत ओढत आहेत.

शिवसैनिकांनाही त्यांची लिखाणाची पद्धत आवडत आहे. कधी कधी सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर आगपाखड केली जाते. तसेच मुंबईत झालेल्या दंगलीवेळी मुस्लिमांविरोधी प्रक्षोभक भाषा वापरली गेली होती. त्यामुळे राऊतांवर शिवसैनिकांची माथी भडकवण्याचे अनेकवेळा आरोपही झाले आहेत. शिवसेना पक्षविरोधी असणाऱ्या अनेक दिग्गज राजकीय नेत्यांवर सामनाच्या अग्रलेखातून, बातम्यांतून तसेच व्यंगचित्रांमधून बोचरी टीका केली जाते.

पवार यांच्याशी कायम जवळीक!

सध्या जागावाटपावर शिवसेना अडून राहिली आहे, राऊत यांनी घेतलेली भूमिका जागावाटपाचा गुंता सोडवण्यात आडकाठी ठरत आहे, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, राऊत हे सुरवातीपासूनच भाजपविरोधी राहिले आहेत. मध्यंतरी शिवसेना स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवणार अशी भूमिका राऊत यांनी घेतली होती. पण, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती केली.

तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची राऊत यांनी घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. मात्र, पक्षीय राजकारण आणि राजकारणापलिकडे असणारी मैत्री या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक वरीष्ठ आणि अनुभवी राजकीय नेते असलेल्या पवार यांची भेट घेणं, याला वेगळं असं कारण नव्हतं, असं स्पष्टीकरणही राऊत यांनी भेटीनंतर दिलं. 

मीडियाला फेस करणारे एकमेव राऊत

संजय राऊत हे जनतेतून निवडून आलेले नेते नाहीत. मात्र, तरीही त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पक्ष बांधणीत त्यांना म्हणावे तेवढे यश मिळाले नसले तरी, शिवसेना पक्षात असणारे त्यांचे महत्त्व कमी नाही. कारण बाळासाहेबांच्या मोजक्या विश्वासू माणसांपैकी ते एक आहेत. तसेच राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक असल्याने मीडियाला फेस करण्यात त्यांचा हात दुसरा कोणताही शिवसेना नेता धरू शकत नाही.

राऊत यांनी ठाकरेंच्या तिन्ही पिढ्यांची स्थित्यंतरे पाहिली आहेत आणि त्याला अनुकूल भूमिका घेतल्या आहेत. सध्या राऊत हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले जातात. शिवसेनेचे राज्यसभा खासदार असल्याने ते दिल्लीत शिवसेनेतर्फे प्रश्न मांडतात. राऊत यांच्या विरोधात सेनेतील एखादा नेता, व्यक्ती माध्यमांसमोर काही बोलल्याचं ना ऐकिवात आलं ना पाहण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com