Bacchu Kadu : राजकारणात योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो; बच्चू कडूंचा कोणाला इशारा
'मीही 20 वर्षांपूर्वी बंड (शिवसेना) केलं होतं; पण..'
Maharashtra Politics : जे उशिरा आले त्यांना पहिल्या रांगेत बसवलं, असं विधान मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं. बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. नंदनवन बंगल्यावर झालेल्या या भेटीनंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपण नाराज असल्याची कबुली दिली. धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रीपद मिळतं असं उपहासात्मक भाष्यही त्यांनी केलं होतं.
यानंतर एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत बच्चू कडू म्हणाले, 50 वर्षांच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. मीही 20 वर्षांपूर्वी बंड (शिवसेना) केलं होतं. जर माझ्याकडून बंड झालं नसतं तर, बच्चू कडू राहिला नसता, कोणत्या निवडणुकीत निवडून आला नसता. त्यामुळं राजकारणात 'जो जिता वहीं सिंकदर' हा नियम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बच्चू कडू पुढं म्हणाले, राजकारण स्वत:साठी नाही, तर सर्वसामान्य जनतेसाठी करायला हवं. त्यामुळं योग्यवेळी योग्य घाव मारावा लागतो. हे बंड जनतेसाठी केलं आहे. राजकारणात घरी बसून चालत नाही, असंही ते म्हणाले. मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून योग्यवेळी सन्मान होईल. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला असून चर्चा करण्यात काही अर्थ नाहीय. मला (मंत्रिमंडळ) पहिल्या पंगतीत बसवलं असतं तर माझा सन्मान वाढला असता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. संजय राठोडांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, राठोडांविरुध्द आरोप सिध्द झाले तर विरोधाला अर्थ आहे, असं त्यांनी म्हटलं. आम्ही मुद्द्यासाठी राजकारण करतो, हुद्यासाठी नाही, असंही ते म्हणाले.
जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं आहे. पण, याची काही नाराजी नाही. राजकारणात असं चालू राहतं. आम्ही तितके समजूतदार आहोत. फक्त मंत्रिपदासाठी आम्ही गेलो नव्हतो. फक्त मंत्री आहे म्हणून बच्चू कडू नाही. मंत्रीपदापेक्षा बच्चू कडू जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचं जास्त दु:ख नाही, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.