मोठी बातमी! कर्जमाफीमुळे थांबलेल्या २३ लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद; सरकारच्या भूमिकेनंतर बॅंकांकडून नोटिसा अन्‌ अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात

अर्थसंकल्पात काहीही निर्णय झाला नाही. आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने थकबाकीदार शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे बॅंकांनी नोटीस बजावणी सुरू केली असून त्यांचे अधिकारीही दारात येत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाल्याची सद्य:स्थिती आहे.
Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Ajit pawar, Devendra Fadanvis, Eknath Shindeesakal
Updated on

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. पण, आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने हात वर केल्याने राज्यातील २३ लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील सुमारे २३ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३५ हजार कोटींची थकबाकी असल्याचे ‘एसएलबीसी’तील सूत्रांनी सांगितले.

दरवर्षी कृषी पतपुरवठ्याचा आराखडा निश्चित होऊन राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या माध्यमातून त्याची जिल्हानिहाय अंमलबजावणी होते. त्यानुसार रब्बी व खरीप हंगामात शेतकऱ्यांना बॅंका कर्जवाटप करतात. पण, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा होता. विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आणि अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केली नाही. त्यानंतर सत्तेत आलेले भाजप सरकार विशेषत: मुख्यमंत्री श्री. फडणवीस निश्चितपणे कर्जमाफी करतील, या आशेने रब्बी हंगामाचेही कर्ज शेतकऱ्यांनी थकविले. पण, अर्थसंकल्पात त्यासंदर्भात काहीही निर्णय झाला नाही आणि आता कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने थकबाकीदार शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे बॅंकांनी नोटीस बजावणी सुरू केली असून त्यांचे अधिकारीही दारात येत असल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाल्याची सद्य:स्थिती आहे.

कर्जमाफीच्या आशेने शेतकऱ्यांची कर्ज परतफेडीकडे पाठ

कर्जमाफीच्या आशेने शेतकरी त्यांच्याकडील कर्ज भरत नसल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे सव्वालाख शेतकऱ्यांकडे ३६०० कोटींचे पीककर्ज थकले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील अशीच स्थिती आहे. दरवर्षीपेक्षा यंदा कर्जाची परफेड (नवे-जुने करणे) करणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. थकबाकीत गेलेल्यांना पुन्हा बॅंकांकडून कर्ज दिले जात नाही.

- राम वाखरडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

शेतकऱ्यांकडील थकबाकीची स्थिती

  • राज्यातील एकूण शेतकरी

  • १.३१ कोटी

  • थकबाकीतील शेतकरी

  • २२.८९ लाख

  • कर्जाची अंदाजे एकूण थकबाकी

  • ३५,००० कोटी

  • सर्वाधिक थकबाकीचे जिल्हे

  • १५

‘या’ जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी थकबाकीत

राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या (एसएलबीसी) अहवालानुसार राज्यातील एक कोटी ३१ लाख ३४ हजार ८१९ शेतकऱ्यांना ३० जून २०२४ पर्यंत बॅंकांनी दोन लाख ४९ हजार ५१० कोटींचे कर्जवाटप केले. त्यापैकी साडेपंधरा लाख शेतकऱ्यांकडे ऑक्टोबर-नोव्हेंबरअखेर ३० हजार ४९५ कोटींची थकबाकी होती. आता ३० मार्च २०२५ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांसह त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम सुमारे पाच हजार कोटींनी वाढली आहे. सर्वाधिक थकबाकीच्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर, धाराशिव, यवतमाळ, वर्धा, परभणी, नंदुरबार, नांदेड, जालना, हिंगोली, गोंदिया, धुळे, गडचिरोली, बीड, बुलढाणा, अमरावती, असे १५ जिल्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com