
थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नोटीस! आता 'सिबील'वर पीक कर्ज
सोलापूर : तालुक्यातील बॅंका व पतसंस्थांकडून येणेबाकी नसल्याचा दाखला (नोड्यूज) घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात होते. परंतु, त्यातही बनावटगिरी होत असल्याचा अनुभव अनेकदा बॅंक अधिकाऱ्यांना आला. तसेच खासगी फायनान्स कंपन्या, खासगी पतसंस्थांकडूनही संबंधिताने कर्ज घेऊन तो थकबाकीत गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता नोड्यूजऐवजी 'सिबिल'चा स्कोअर पाहून बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज व मॉर्टगेज लोन दिले जात आहे.
हेही वाचा: झेडपीवर 21 मार्चपासून प्रशासक! पंचायत समित्यांची मुदत 13 मार्चपर्यंतच
राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडून दरवर्षी राज्यातील 70 ते 80 लाख शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगामात जवळपास 60 हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्टे ठरवून दिले जाते. जिल्हा मध्यवर्ती बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांचा शेती कर्जवाटपाचा टक्का आता वाढला आहे. पण, बॅंकांकडून संबंधिताच्या 'सिबिल'वर बोट ठेवले जात आहे. कर्ज मागणीवेळी शेतीचा सात-बारा उतारा, शेतातील पिकांची नोंद असलेला उतारा आणि तो शेतकरी कोणत्याही ठिकाणी थकबाकीत नसल्याची खात्री करण्यासाठी त्याचा 'सिबिल' रिपोर्ट पडताळून पाहिला जात आहे. खासगी फायनान्सकडून कर्ज घेऊनही त्याने वेळेत परतफेड केली नसल्यास त्या शेतकऱ्याला कर्ज दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पीक कर्जासह त्या शेतकऱ्याला शेती तारण कर्ज हवे असल्यास त्याचे मागील व्यवहार पडताळून पाहिले जातात. तसेच तो 2008 पासून झालेल्या तिन्ही कर्जमाफीचा लाभार्थी आहे का, याचीही खात्री केली जात आहे. त्यावरून संबंधित शेतकऱ्याची कर्ज परतफेडीची मानसिकता पाहिली जात असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा: राष्ट्रवादीसह विरोधकांचा चक्रव्यूह! कॉंग्रेसमधील पक्षांतरामुळे आमदार प्रणिती शिंदे एकाकी
दोन लाखांवरील थकबाकीदारांना नोटीस
महागाई, शेती मशागतीसह बियाणे, खतांच्या किंमती वाढल्याने आता 1 एप्रिलपासून पीक कर्जाची मर्यादा वाढविली जाणार आहे. दुसरीकडे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन हंगामापूर्वी (एक वर्षांत) कर्जाची परतफेड अथवा नवे-जुने करणे अपेक्षित आहे. दरम्यान, दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या आशेने अजूनपर्यंत कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यांना नव्याने कर्ज मिळणे बंद झाले आहे. बॅंकांकडून त्या कर्जदारांना वसुलीच्या नोटीस बजावल्या जात आहेत. परंतु, कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीला नकार दिल्याचे बॅंकांचे अधिकारी सांगत आहेत.
हेही वाचा: पुन्हा खोटेच आश्वासन! हप्ते पाडण्याचा आदेश नसल्याने शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणी सुरुच
दोन लाखांवरील थकबाकीदारांची संख्या वाढली असून कर्जमाफी मिळेल म्हणून ते थकबाकी भरत नसल्याची वस्तुस्थिती आहे. कर्ज मागणारा शेतकरी कोणत्याही वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्यांचा थकबाकीदार नसावा, जेणेकरून त्याला कर्ज मिळण्यास अडचणी येतील. 650 पेक्षा अधिक सिबिल स्कोअर असलेल्या शेतकऱ्याला लगेच कर्ज मिळते.
- प्रशांत नाशिककर, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, सोलापूर
Web Title: Banks Issue Notices To Farmers In Arrears Now Crop Loan On
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..