Study Tips: नक्की वाचा, सर्वांनाच होईल फायदा! परीक्षा अन्‌ अभ्यासाचे टेन्शन दूर करणारी चतु:सूत्री

आयुर्वेदानुसार वेळेवर जेवण आणि किमान सहा तासांची झोप, शरीरासाठी चांगली. अपुरी झोप मनावरील ताण वाढवते. सलग काही तास एकाच ठिकाणी बसून न राहता एक-एक तासांनी चालावे, सुक्ष्म व्यायाम करावा. अभ्यासासाठी पहाटेचीच वेळ निवडावी.
Study Tips
Study Tipssakal

Study Tips : ‘परीक्षा जवळ आली की अभ्यास’ अशी पद्धत वापरणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण वाढतो. निकोप स्पर्धा ही कौशल्यांचा विकास करते. मात्र, इर्षेपोटी केलेल्या स्पर्धेतून ताण वाढतो आणि त्यातून मानसिक विकारांचा जन्म होतो.

मुलांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात पालकांनी अपेक्षा ठेवल्याने मुलांवरील ताण वाढतो आणि त्यात अपयश आल्यास नैराश्य येते ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर योग्य जेवण, पुरेशी झोप, हलका व्यायाम आणि वेळेचे नियोजन, ही चतुःसूत्रीच यशाची गुरुकिल्ली आहे.

मानसिक-शारीरिक स्वास्थाची चतुःसूत्री

१) भुकेपेक्षा कमीच जेवण करा

परीक्षा काळात अभ्यासाचा ताण, जागरणामुळे पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे भुकेपेक्षा कमीच जेवण करावे. पचायला हलके पदार्थ खावेत आणि रात्री लवकरच (आठपूर्वी) जेवण करावे. फास्ट फूड, तिखट, जास्त तेलकट, मसालेदार व चमचमीत, आंबवलेले पदार्थ खाणे टाळायला हवे. जेवताना व जेवणानंतर भरपूर पाणी प्यावे. जेवणानंतर लगेचच अभ्यासाला बसताना वज्रासनात बसावे.

--------------------------------------------------------------------------------

२) योगासने, चालणे, मैदानी खेळ खेळा

अभ्यासाला बसताना पाठीचा कणा ताठ राहील, अशी बैठक व्यवस्था असावी. एका तासानंतर थोडावेळ चालावे आणि पुन्हा अभ्यासाला बसावे. अभ्यास करताना आळस येवू नये म्हणून हात, पाय व मानेचे सुक्ष्म व्यायाम खुर्चीवर बसूनही करता येतील.

त्यामुळे ताण कमी होऊन रक्तसंचरण सुरळीत सुरु राहते. परीक्षा काळात देखील मानसिक स्वास्थ्य मजबूत राहण्यासाठी काहीवेळ दररोज १०-१५ मिनिटे ध्यान, श्लोक पठण, स्त्रोत्र वाचन करावे. योगासने, चालणे, मैदानी खेळ खेळायला काही हरकत नाही. त्यातून मनालाही ऊर्जा मिळते.

--------------------------------------------------------------------------------

३) शिल्लक वेळेत उजळणी, नोट्‌स काढाव्यात

आता परीक्षा काही दिवसांवर आली असून प्रत्येकांनी अभ्यासाचे नियोजन (वेळापत्रक) करून ठेवायला हवे. त्यामुळे मनावरील अभ्यासाचा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होते. वेळापत्रकानुसार शिल्लक वेळेत उजळणी, नोट्‌स काढाव्यात.

प्राणायामातून मनावरील ताण होऊन मनाची स्थिरता वाढते. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा. तासन्तास पाठांतर करण्यापेक्षा लक्षात राहील, असा अभ्यास करा. मोठ्याने वाचा, महत्त्वाच्या शब्दाखाली रेघा ओढा. नोट्‌स स्वत:च्या हस्ताक्षरात काढून त्यातील मुद्द्यांचा अभ्यास करावा.

--------------------------------------------------------------------------------

४) मनाचा आत्मविश्वास व सर्वांशी सुसंवाद

परीक्षा जवळ आली, आता अभ्यास कसा करायचा, टक्केवारी कमी पडेल आणि त्यानंतर शिक्षक-नातेवाईक काय म्हणतील, अशा प्रश्नांमुळेच ताण वाढतो. पण, मेहनतीतून आपण सहज लक्ष गाठू शकतो, हा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्याला हवा.

अडचणीचा प्रश्न किंवा मुद्दा मित्र-मैत्रिणी व विषय शिक्षकांशी शेअर करा. पालकांशी सुसंवाद ठेवा. त्यातून सोपी पद्धत समोर येईल आणि मनातील शंका दूर होईल. कितीही अभ्यास असला, तरीदेखील वेळेचे नियोजन करून व्यायाम, छंद, मनमोकळ्या गप्पांसाठी थोडा वेळ दिल्यास ताण कमी होऊन आत्मविश्वास टिकून राहील.

आयुर्वेदिक डॉक्टर गायत्री देशपांडे सांगतात...

परीक्षा काळात मुले आजारी पडतात आणि त्याचा अभ्यास तथा टक्केवारीवर परिणाम होतो. मानसिक ताण, अयोग्य आहार, अपुरी झोप ही त्यामागील कारणे असतात. अभ्यासात व्यस्त आणि व्यायामाकडे दुर्लक्ष, यामुळे पण अनेकजण आजारी पडतात.

अशावेळी आयुर्वेदानुसार वेळेवर जेवण आणि किमान सहा तासांची झोप, शरीरासाठी चांगली. अपुरी झोप मनावरील ताण वाढवते. सलग काही तास एकाच ठिकाणी बसून न राहता एक-एक तासांनी चालावे, सुक्ष्म व्यायाम करावा. अभ्यासासाठी पहाटेचीच वेळ निवडावी. वातावरण शांत असल्याने मनाची एकाग्रता राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com