भीमा कोरेगाव प्रकरण : रश्मी शुक्ला चौकशी आयोगापुढे हजर, पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

भीमा कोरेगाव प्रकरण : रश्मी शुक्ला चौकशी आयोगापुढे हजर, पण...

मुंबई : भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भीमा कोरेगाव चौकशी आयोगापुढं दोन दिवस साक्ष नोंदवण्यात येणार आहे. त्यानुसार आज पहिल्या दिवशी त्यांनी आयोगापुढं हजेरी लावली. मात्र, काही आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यानं त्यांची साक्ष नोंदवण्यात आली नाही. दरम्यान, पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यांनी दिली.

मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये आज आणि उद्या रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदविली जाणार होती. सन २०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतू ते हजर झाले नाहीत. त्यावेळी सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर होते.

शुक्ला यांनी मात्र आयोगासमोर हजेरी लावली. तसेच शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. या कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचं यावेळी त्यांनी आयोगापुढं सांगितलं.

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी एक विजयस्तंभ आहे, जो आंबेडकरी जनतेसाठी प्रेरणास्थान असून दरवर्षी १ जानेवारी रोजी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनता अभिवादनासाठी येते. दरम्यान, ज्या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारला आहे. त्या लढाईला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या ठिकाणी मोठा जनसमुदाय लोटला होता. याचवेळी या ठिकाणी हिंसाचार उसळला होता.

टॅग्स :Maharashtra News