

Farmer Scheme
ESakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये, यासाठी दिर्घकालीन उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३० जून २०२५ व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाने बॅंकांकडून मागविली आहे. यात १९९० पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचीही माहिती आहे.
शेतकऱ्यांना पाच-सात वर्षानंतर कर्जमाफी का मागावी लागते, दरवर्षी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी थकबाकीत जातात, त्यांची पीकपद्धती, तेथील जमीन व पाण्याची सोय, हवामान या बाबींचा अभ्यास कृषी विभागाकडून केला जात आहे. राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी माजी सनदी अधिकारी प्रविणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीचा अहवाल पुढील दीड महिन्यात शासनाला सादर होणार आहे. त्यानंतर दिर्घकालिन उपाययोजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्जमाफीसाठी साधारणत: ४० हजार कोटी रुपये लागणार आहेत. ३० जून २०२५ पर्यंत राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकऱ्यांकडे ३५ हजार ४७७ कोटींची थकबाकी आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पावणेतीन लाख शेतकरी थकबाकीत असून त्यांच्याकडे तीन हजार ९७६ कोटींची थकबाकी आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे २४ हजार शेतकरी थकबाकीत असल्याचे समजते. दरम्यान, २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांचीही माहिती सहकार विभागाने मागविली असून त्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील विकास कार्यकारी सहकारी सोसायट्यांकडून जिल्हा बॅंकेला माहिती देण्यात आलेली नाही. ज्यांची माहिती शासनाला जाणार नाही, तेथील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, असेही बोलले जात आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार की काही लाखांची कर्जमाफी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कर्जमाफी अन् दिर्घकालीन उपाययोजनाही
३० जून २०२५ व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बॅंकांकडून मागविली आहे. याशिवाय मागील पाच वर्षांतील नियमित कर्जदार शेतकऱ्यांचीही माहिती घेतली जात आहे. दिर्घकालिन उपाययोजना आणि कर्जमाफीच्या अनुषंगाने ही माहिती मागविण्यात आली आहे.
- दिपक तावरे, आयुक्त, सहकार
१४ जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी (कोटींमध्ये)
जिल्हा शेतकरी थकबाकी
सोलापूर २,७१,९७३ ३९७६
पुणे १,०५,६११ २,४९८
नाशिक ८१,७९७ २,८२९
परभणी १,५२,२०७ १,५००
धाराशिव ५२,७१६ १,०९३
नांदेड १,६५,३१२ १,२६८
नागपूर ६८,७५१ १,१६३
मुंबई २४,५३१ १,०६३
जालना १,७२,६४८ १,९९२
बुलढाणा १,६७,२७३ १,४७१
बीड १,१९,१८८ १,४६४
छ.संभाजीनगर १,०४,४२९ १,६००
अमरावती १,१७,४०२ १,३६०
अहिल्यानगर ५८,६११ १,४८१
शेतकरी अन् थकबाकीची स्थिती
एकूण शेतकरी
१,३३,४४,२०९
एकूण कर्जवाटप
२,७८,२६५ कोटी
थकबाकीदार शेतकरी
२४,७३,५६६
शेकऱ्यांकडील थकबाकी
३५,४७७ कोटी
(स्रोत : एसएलबीसीचा रिपोर्ट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.