

Police in Solapur city news
तात्या लांडगे
सोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना महिलांसाठी आहेत. तसेच गॅस सिलिंडर, वैयक्तिक योजनांसाठी विविध घटकांमधील पुरुषांसाठीही योजना आहेत. त्यासाठी आधारकार्डसोबत स्वत:चा चालू मोबाईल क्रमांक लिंक करावा लागतो. त्या मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी अनेक बेपत्ता झालेल्या किंवा आमिषातून पळविलेल्या महिला, तरुणी शोधल्या आहेत. याशिवाय काही गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यातही योजनांसाठी लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकाची मदत झाली आहे.
सोलापूर शहरातून काही दिवसांपूर्वी एक महिला बेपत्ता झाली होती. ती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी होती. पोलिसांनी त्या महिलेचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि लोकेशनवरून तिचा शोध घेतला. याशिवाय काही गुन्ह्यांच्या तपासामध्ये देखील असाच फायदा पोलिसांना झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येक योजनांसाठी लाभार्थींना आधार व मोबाईल लिंक बंधनकारक आहे. त्यात महिला, शेतकरी, तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना आहेत. ज्यावेळी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होतो, त्यावेळी लाभार्थी कधी ना कधी ते पैसे काढतो. त्यावेळी देखील लाभार्थीचे लोकेशन पोलिसांना समजते.
अनेकदा आरोपी मोबाईल बंद- चालू करतात, मोबाईल किंवा सीमकार्ड बदलतात. अशावेळी पोलिस खबऱ्यांमार्फत त्यांचा शोध घेतात. दरम्यान, चोरी, घरफोडी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, बालविवाह, बालकांवर अत्याचार अशा दाखल गुन्ह्यांच्या यशस्वी तपासाचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत आहे. त्यात पोलिसांना तंत्रज्ञानाचा म्हणजेच सायबर पोलिसांची मोठी मदत होते.
पोलिस अधिकारी म्हणतात...
एखादी महिला, तरुणी बेपत्ता झाली किंवा एखाद्या गुन्ह्यातील महिला, तरुणी पसार होते, त्यावेळी ती कोणत्या शासकीय योजनांची लाभार्थी आहे का?, हे पाहिले जाते. कारण, तिच्या घरी कोणी नसल्याने तेथे मोबाईल क्रमांक मिळत नाही. शासकीय योजनांसाठी लिंक मोबाईल क्रमांकावरून ती महिला नेमकी कोठे आहे, याचे लोकेशन सायबर पोलिसांकडून मिळविले जाते. याशिवाय खबऱ्यांकडून, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक या माध्यमातून देखील पोलिस आरोपींना शोधतातच. त्यात आता नव्या युक्तिची भर पडली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी सांगतात.
तांत्रिक तपासातून सापडतात आरोपी
पॅनकार्ड, आधारकार्ड, बॅंक खाते, शासकीय योजनांसाठी बहुतेक व्यक्तीचा मोबाईल क्रमांक लिंक असतो. आरोपी किंवा अन्य कोणीही मोबाईलशिवाय राहात नाही. त्यामुळे तो कधी ना कधी सापडतोच. त्यासाठी तांत्रिक तपास भरपूर करावा लागतो.
- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.