मोठी बातमी! सोलापूर विमानतळ परिसरात पोलिसांची दररोज १२ तास गस्त, महापालिकेकडून २००० कुटुंबांना सूचनापत्र; भटकी कुत्री, घारी, मांजर, पतंग यावर लक्ष

सोलापूर विमानतळाच्या परिसरात उडविलेल्या पतंगाचा मांजा मुंबई-सोलापूर विमानाच्या पंख्यात अडकला. त्यानंतर शहर पोलिस, महापालिका व विमानतळ प्राधिकरण खडबडून जागे झाले. हा धोका पुन्हा होऊ नये म्हणून एमआयडीसी पोलिसांनी विमानतळ परिसरात १२ तास गस्त सुरू केली आहे. महापालिकेने घंटागाड्या दुप्पट केल्या असून आता अतिक्रमण देखील काढले जाणार आहे.
solapur airport

solapur airport

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर विमानतळाच्या परिसरात उडविलेल्या पतंगाचा मांजा मुंबई-सोलापूर विमानाच्या पंख्यात अडकला. त्यानंतर शहर पोलिस, महापालिका व विमानतळ प्राधिकरण खडबडून जागे झाले. हा धोका पुन्हा होऊ नये म्हणून एमआयडीसी पोलिसांनी विमानतळ परिसरात १२ तास गस्त सुरू केली आहे. महापालिकेने घंटागाड्या दुप्पट केल्या असून आता अतिक्रमण देखील काढले जाणार आहे.

विमानतळाच्या भिंतीलगत अतिक्रमण करून अनेकांनी घरे बांधली आहेत. त्यांच्याकडून शिळे अन्न व मांसाचे तुकडे भिंतीच्या आत टाकले जातात. त्यामुळे विमानतळ परिसरात भटकी कुत्री, मांजर व घारी (पक्षी) त्याठिकाणी येतात. याशिवाय भिंतीला भगदाड पाडून, तारेचे कंपाऊंड तोडून तरुण आतमध्ये येऊन पतंग उडवितात. याचा विमानसेवेला मोठा धोका असल्याने विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. गोवा, मुंबईनंतर आता सोलापुरातून बंगळुरू व बेळगाव या मार्गावरही विमानसेवा सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ परिसरात सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत एमआयडीसी पोलिस गस्त घालत आहेत. दुसरीकडे महापालिका अधिकाऱ्यांनीही स्वच्छता, अतिक्रमण आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. या आठ दिवसांत अतिक्रमण काढणे, विमानतळ परिसरातील लोकांना सूचनापत्र देणे, गॅरेजवाल्यांनाही टायर न जाळण्याच्या सक्त सूचना करणे, अशी कारवाई होणार आहे.

स्वच्छता, अतिक्रमण, भटकी कुत्री याअनुषंगाने आता कार्यवाही

विमानतळ परिसरातील लोकवस्तीत महापालिका अधिकाऱ्यांनी पहाणी केली आहे. विमानसेवेला कोणताही अडथळा होणार नाही, यादृष्टीने आता सुमारे दोन हजार कुटुंबांना सूचनापत्र दिले जाणार आहे. अतिक्रमण विभाग, भटक्या कुत्र्यांचा विभाग देखील त्याठिकाणी कारवाई करेल. स्वच्छतेसाठी घंटागाड्या वाढविल्या असून परिसरातील गॅरेजवाल्यांनीही टायर जाळू नये, अशा सूचना दिल्या जातील.

- वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, सोलापूर

अतिक्रमण काढण्यासाठी आता संयुक्त कारवाई

विमानतळाच्या कंपाऊंडलगत काही खोकी आहेत. याशिवाय भिंतीलगत काही पत्र्याची घरे, पक्की बांधकामे करण्यात आलेली आहेत. त्याठिकाणी दोन प्रकारचे अतिक्रमण असून खोकी महापालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून हटविली जाणार आहेत. तर पत्राशेड, बांधकामांचे अतिक्रमण विमानतळ व महापालिकेचा बांधकाम परवाना विभाग पोलिसांच्या मदतीने काढणार आहे.

घंटागाड्यांमधून विमानतळ सुरक्षेचे धडे

विमानतळालगत अस्वच्छता, शिळे अन्न, मासांचे तुकडे विमानसेवेला किती घातक आहेत, याचा संदेश घंटागाड्यांमधून दिला जाणार आहे. पूर्वी विमानतळ परिसरात दोन घंटागाड्या होत्या, आता ही संख्या दुप्पट केली आहे. कोणीही घराबाहेर कचरा टाकू नये म्हणून त्या गाड्या प्राधान्याने तेथे जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com