esakal | भाजपच्या माजी आमदाराचे पुत्र काँग्रेसमध्ये; सत्येंद्रसिंह यांची भाजपवर टीका | Dr satyendra singh
sakal

बोलून बातमी शोधा

Dr satyendra Singh

भाजपच्या माजी आमदाराचे पुत्र काँग्रेसमध्ये; सत्येंद्रसिंह यांची भाजपवर टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : इंधन दरवाढ, द्वेषाचे राजकारण, भाजपमध्ये (BJP) होत असलेली घुसमट, जनतेतील असंतोष आदी मुद्यांवरून भाजप नेतृत्वावर सडकून टीका करीत, भाजपचे दोनदा आमदार राहिलेल्या अभिराम सिंह यांचे पुत्र डॉ. सत्येंद्रसिंह (dr satyendra singh) यांनी आज भाजपचा राजीनामा (Bjp resignation) देत काँग्रेसमध्ये (congress) प्रवेश केला.

हेही वाचा: मुंबई विद्यापीठ उभारणार संगीत महाविद्यालय : कुलगुरूंनी दिले आश्वासन

उत्तर भारतातील शेतकरी आंदोलनाची परिस्थिती चिघळल्याने तेथे भाजपविरोधात असंतोष वाढत आहे. त्याचेच प्रतिबिंब मुंबईतील उत्तर भारतीयांमध्ये पडत आहे की काय, अशीही चर्चा आहे. सत्येंद्रसिंह यांच्या भाजपच्या राजिनाम्यामुळे त्या चर्चेला बळ मिळाल्याचे सांगितले जात आहे. अभिरामसिंह हे सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दोन वेळा आमदार राहिले होते. सत्येंद्र सिंह हे देखील भाजप मध्ये होते. मात्र त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माझे वडील भाजपकडून दोन वेळा आमदार झाल्याने मी देखील भाजपमध्ये आलो, मात्र तेथे माझा जीव गुदमरत होता. भाजपची धोरणे मला अजिबात आवडली नाहीत. सध्या देशात ज्या प्रकारचे द्वेषाचे राजकारण केले जात आहे ते फार काळ टिकणारे नाही. सरकार चालवण्यासाठी भाजपपेक्षा काँग्रेस अधिक परिपक्व आहे, असे लोकांना वाटू लागल्याचेही सत्येंद्रसिंह यांनी बोलून दाखवले.

हेही वाचा: Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढली; आज 532 नवे रुग्ण

कोरोनाच्या साथीमुळे देशातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाला आहे, लोकांना काम नाही. प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांचे जीवनमान खालावले आहे. तरीही इंधनाच्या किमतीत दररोज होणारी वाढ पाहता भाजप नेतृत्व पूर्णपणे असंवेदनशील असल्याचे दिसते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर सत्येंद्रसिंह यांना पक्षात पूर्ण संधी दिली जाईल, असे जगताप यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top