'बलात्काऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी मंत्र्यांमध्ये चढाओढ; मुख्यमंत्र्यांनी जाब विचारावा'

टीम ई सकाळ
Tuesday, 23 February 2021

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घाणेरडं राजकारण होत असल्याचं सांगत वनमंत्री संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. पूजाच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर आले.

मुंबई - टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घाणेरडं राजकारण होत असल्याचं सांगत वनमंत्री संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. पूजाच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच ते माध्यमांसमोर आले. त्यांनी म्हटलं की, कृपा करून माझी, कुटुंबाची आणि समाजाची बदनामी करू नका. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समती नेमली असून पोलिस तपास करत आहेत. सत्य काय आहे ते समोर येईलच. त्यांनी पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. 

मंत्र्यांमध्ये बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी चढाओढ सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी हे चित्र साजेसं नाही. सरकारने आता अॅक्शनमोड मध्ये येण्याची गरज असून हत्यारा संजय राठोडच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. पूजा चव्हाणबद्दल बरीच उलट सुलट चर्चा सुरु आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी म्हटलं की, असं कसं बोललं जातंय, कुणाचं तरी लेकरू गेलंय, मी तिचं प्रोफाइल पाहिलंय, ती धाडसी आणि कर्तृत्ववान वाटली.

हे वाचा - Sanjay Rathod : दबाव आणण्यासाठी हे शक्ती प्रदर्शन तर नाही ना?

मृत्यूची चौकशी व्हावी
आई वडिलांनी तिची बदनामी करू नका असं सांगितलं. त्यानतंर दुसऱ्याच दिवशी पूजाच्या आजीने आत्महत्येवर शंका उपस्थित केली. मुलगी धाडसी होती ती आत्महत्या करणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे पूजाच्या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे.

बंजारा समाजातूनही कारवाईची मागणी
बंजारा समाजातील अनेकांनी संजय राठोड यांना शिक्षा व्हावी अशी मागणी आपल्याकडे केली आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. बंजारा समाज हा निसर्गपूजक समाज आहे, भावनांना महत्त्व नाही असंही त्या म्हणाल्या. गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं. 

तपासावर शंका
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अनेक मेसेज, ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्याबाबत सांगताना चित्रा वाघ म्हणाल्या की, शेंबडं पोरगं सांगेल ऑडिओतला आवाज कुणाचा आहे. तसंच या प्रकरणामध्ये जो अहवाल सादर केला आहे तो एक प्रकारची धूळफेक आहे. त्या अहवालात मुख्य संशयित आरोपी संजय राठोडची चौकशी होत नाही तोपर्यंत अहवालाला कसलीच किंमत नाही असंही चित्रा वाघ म्हणाल्या. 

हे वाचा - नवीनच माहिती : संजय राठोड दोन दिवसांपासून यवतमाळातच मुक्कामी!

समाजाला वेठीस धरतायत
संजय राठोड यांनी केलेलं कृत्य हे अत्यंत गलिच्छ स्वरुपाचं आहे. आपण शेण खायचं आणि ते निस्तरण्यासाठी समाजाला वेठीस धरायचा हा प्रकार आहे. राजकारणातला हा ट्रेंड खपवून घेणार नाही अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी सरकारला इशारा दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही गर्दी
पोहरादेवीच्या दर्शनाला गेलेल्या संजय राठोड यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचा दावा केला जात आहे. यावरूनही चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, संजय राठोड यांच्या पोहरादेवीच्या दर्शनावेळी प्रचंड गर्दी झाली. एकीकडे मुख्यमंत्री गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहन करत आहेत. त्यांच्या आवाहनानंतर अनेक नेत्यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केले. असे असताना त्यांच्याच पक्षातला मंत्री अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करतो. गलिच्छ कृत्य लपवण्यासाठी ही केविलवाणी धडपड असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत जाब विचारला पाहिजे असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पोलिसांची क्षमता कमी झाली का?
पोलिसांच्या तपासाबाबत बोलताना चित्रा वाघ यांनी म्हटलं की, मोबाइल वगैरे आता आले. त्याआधी गुन्हे व्हायचे तेव्हा सुतावरून फासापर्यंत गुन्हेगाराला पोहोचवलं जायचं. मुंबई पोलिसांची तुलना जगातल्या टॉप पोलिसांशी केली जाते. मग आता पोलिसांची क्षमता कमी झाली का असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. आता व्हॉटसअॅप चॅट मिळत नाही, मोबाइल ट्रॅक होत नाही अशी कारणे सांगितली जात आहेत. पोलिसांची क्षमता राहिली नाही का तपास करण्याची? असे चित्रा वाघ यांनी विचारले. 

राज्यात महिला अत्याचार वाढले
राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं सांगत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्र सोडले. काय चाललंय राज्यात असा सवालही त्यांनी केली. ठाकरे सरकारची ही शिवशाही नव्हे तर मोगलाई असल्याचा घणाघात त्यांनी केला. दिवसेंदिवस राज्यात अत्याचार वाढत चालला आहे असे चित्रा वाघ यांनी म्हटलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp chitra wagh on pooja chavan suicide case sanjay rathod connection