हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारावर, ईडीकडे करणार तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirit somaiya

हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला.

हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारावर, ईडीकडे करणार तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानतंर सोमय्या यांनी ११ नेत्यांची नावेही सांगितली होती. दरम्यान, त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावाही फेसबुक लाइव्हद्वारे बोलताना केला. महाआघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबईत ईडीकडे मंगळवारी याविरोधात अधिकृत तक्रार करणार आहे. २७०० पानांचे पुरावे त्यांच्याकडे देईन. त्यानंतर दिल्लीला ईडी, अर्थ मंत्रालया, कंपनी मंत्रालयाकडे हे पुरावे देणार आहे. ठाकरे सरकारमध्ये डर्टी घोटाळा ११ मध्ये राखीव खेळाडूंची भरती चालूच राहणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं.

हेही वाचा: राऊतांची तालिबानी वृत्ती रश्मी ठाकरे ठेचणार का? चित्रा वाघ यांचा सवाल

माझ्याकडे दोन मंत्र्यांच्या फाइल तयार होत्या. एक राष्ट्रवादी एक शिवसेनेच्या. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढू असे किरीट सोमय्या म्हणाले.

प्रताप सरनाईक, अनिल देशमुख , अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरीताई पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, रविंद्र वायकर, छगन भुजबळ , यशवंत जाधव, यामिनि जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याआधी घेतली होती. त्यात आता राखीव खेळाडू म्हणून हसन मुश्रीफ यांचेही नाव वाढवले असे ते म्हणाले. मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा, बोगस कंपन्या, त्यांच्या नावे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात त्यांनी २७०० पानांचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी सांगितले की मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे.

हेही वाचा: कोझिकोड विमान अपघातामागची कारणे काय? चौकशी अहवाल आला समोर

निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले असल्याचा दावाही सोमय्यांनी यावेळी केला.

मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २.८९ कोटी रुपये या रकमा या कारखान्याच्या नावावर जमा झाल्याचेही सोमय्या म्हणाले.

Web Title: Bjp Kirit Somaiya Says Will Complaint Against Hasan Mushrif To Ed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kirit Somaiya