'संजय राऊतांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 November 2019

एक महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना डांबून ठेवण्यात येत आहे. या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये आमदारांना का ठेवलं जात आहे? हे समजत नाही.

मुंबई : ''भाजप नेत्यांना सत्तेचं वेड लागलंय, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, सत्तेचं वेड तर राऊत यांनाच लागलंय. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. याच राऊतांनी कपिल सिब्बल यांच्यावर बेछूट आरोप करताना त्यांना माकड म्हटले होते. मात्र, तेच कपिल सिब्बल आज त्यांची बाजू कोर्टात मांडत आहेत. शिवसेनेला अजून साधा वकील शोधता आला नाही, असा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केला. 

ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत अस्थिर वातावरण निर्माण झालं. राज्यपालांनी पहिल्यांदा भाजपला सरकार बनविण्याचं निमंत्रण दिलं. भाजपने ते सरकार बनवू शकत नाहीत असं निवेदन दिले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले. मात्र कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

परिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना राज्यात सरकार अस्तित्वात नव्हतं, पण राज्यपालांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपात मदत जाहीर केली. शेतकऱ्यांचा एकूण नुकसानीचा अंदाज आल्यानंतर केंद्र मदत करेल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आणलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्रकावर विश्वास ठेवत भाजपने त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. 

- आम्हाला वेडे म्हणणाऱ्यांचीच 'पागलपंती' सुरू : आशिष शेलार 

दानवे पुढे म्हणाले, राज्यपालांनी घटनात्मक बाबी पूर्ण केल्या नाहीत, असा आरोपही राऊत यांनी केला. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या आणि स्वत: गटनेते अजित पवार त्याठिकाणी उपस्थित असल्यामुळे राज्यपालांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. राऊत यांनी केलेला आरोप खोटा आहे. आज कोर्टाने निर्णय देताना या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नाही. 

- अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट...

भाजप विरोधी पक्षाच्या आमदारांना धमकवत आहे, असा आरोप राऊत यांनी केला. एक महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना डांबून ठेवण्यात येत आहे. या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये आमदारांना का ठेवलं जात आहे? हे समजत नाही. शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना आमदार हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे.

- अजित पवारांचे अश्रू महाराष्ट्राला पुन्हा दिसतील : संजय राऊत

काँग्रेसने अजून गटनेत्याची निवड केली नाही. जो पर्यंत गटनेता निवडला जात नाही, तोपर्यंत सत्ता स्थापनेसाठीचा दावा त्यांना करता येत नाही. राष्ट्रवादीचे गटनेते भाजपसोबत सत्ता स्थापन केलेलं आहे. आणि राज्याचे जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना न्याय दिला जाईल, असा विश्वास दानवेंनी यावेळी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Raosaheb Danve criticized Shivsena MP Sanjay Raut