
महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे एखादा विषय हाती घेतला तर तो चुटकीसरशी सोडायचे. ते प्रचंड चाणाक्ष व धुरणधंर नेतृत्व होते.
औरंगाबाद : महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे एखादा विषय हाती घेतला तर तो चुटकीसरशी सोडायचे. ते प्रचंड चाणाक्ष व धुरणधंर नेतृत्व होते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते शिवाजी धाराशिवे यांनी आठवणी जागवल्या. आज शनिवारी गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्त ई सकाळने त्यांच्याशी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात ९१-९२ सालच्या दरम्यान आलो असल्याचे धाराशिवे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना मुंडे यांनी महागाईच्या विरोधात मोर्चा काढला होता. तो महाराष्ट्रात गाजला होता.
खुद अटलबिहारी वाजपेयी यांनीही कौतुक केले होते. गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. ही यात्रा साधारण ४५ दिवस राज्यात सुरु होती, असे धाराशिवे सांगतात. या दरम्यान त्यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची मैत्री राजकीय क्षेत्रात आजही चर्चेचा विषय असतो. या मैत्रीबाबत आठवण सांगताना शिवाजी धाराशिवे म्हणतात, की मराठवाडा पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव काळे हे दोन वेळेस आमदार होते. ते तिसऱ्यांदा निवडून येतील ही शक्यता होती. मात्र भाजपचे श्रीकांत जोशी नवखे होते. त्यांच्याबरोबर मुंडे होते. या निवडणुकीत जोशी निवडून आले. यातून विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीची प्रचिती आली. मुंडेंमुळे महाराष्ट्रातला ओबीसी गट एकत्र आला. ते सामान्यांचे नेते होते. पांडुरंग फुंडकर, जयसिंगराव गायकवाड, रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली तयार झाल्याचे धाराशिवे सांगतात.
कार्यकर्त्यांविषयी जिव्हाळा
गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम होते. एखाद्याला व्यवसाय सुरु करण्यास आर्थिक मदतीसह ते मार्गदर्शन करत असतं. शिवसेना व भाजपला संघटनात्मक फायदा गोपीनाथ मुंडेंमुळे झाल्याचे निरीक्षण शिवाजी धाराशिवे नोंदवितात.