गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच विद्यार्थी प्रतिनिधीची मिळाली संधी, शरद देवगावकरांनी जागवल्या आठवणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopinath Munde

निवडणुकीचा कुठलाही गंध नसताना, गोपीनाथराव मुंडे व प्रमोद महाजन यांच्यामुळे एका रात्रीतून महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. अशा आठवणी त्यांच्यासोबत एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतलेले शरद देवगावकर यांनी सांगितल्या.

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच विद्यार्थी प्रतिनिधीची मिळाली संधी, शरद देवगावकरांनी जागवल्या आठवणी

अंबाजोगाई : निवडणुकीचा कुठलाही गंध नसताना, गोपीनाथराव मुंडे व प्रमोद महाजन यांच्यामुळे एका रात्रीतून महाविद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. अशा आठवणी त्यांच्यासोबत एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतलेले शरद देवगावकर यांनी सांगितल्या. गोपीनाथराव मुंडे व शरद देवगावकर हे १९७० मध्ये एकाच वेळी योगेश्वरी महाविद्यालयातून पदवीधर झाले. गोपीनाथराव मुंडे हे कला शाखेत तर देवगावकर आणि प्रमोद महाजन विज्ञान शाखेत शिक्षण घेत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे ते एकत्र येत असत.

काही आठवणी सांगताना श्री. देवगावकर म्हणाले, महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीकडे काहीही लक्ष नव्हते. एका दिवशी रात्री गोपीनाथराव मुंडे व प्रमोद महाजन माझ्याकडे आले. त्यांनी तुला सी. आर. ची निवडणूक लढवायची आहे. तु फक्त उद्या फाँर्म भर अशी गळ घातली. त्यांच्यामुळेच निवडूनही आलो. त्यावेळी महाविद्यालयात राष्ट्रसेवा दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असे गट होते. आम्ही मुंडे व महाजनांच्या गटात असायचो, यातूनच मुंडेंचे नेतृत्व पुढे विकसीत होत गेले. असेही श्री. देवगावकर यांनी सांगितले.


सर्वसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली - कराड
गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळेच मला राजकारणात पद व समाजात प्रतिष्ठा मिळाली. अशा भावना व आठवणी त्यांच्यासोबत राहिलेले माजी नगरसेवक मोहन कराड यांनी व्यक्त केल्या. गोपीनाथराव मुंडे योगेश्वरी महाविद्यालयात होते. तर मोहन कराड हे खोलेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेत होते. परंतु विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमुळेच त्यांचा परिचय झाला. या परिचयाचे रुपांतर पुढे मैत्री व कार्यकर्ता म्हणून झाले. श्री. कराड म्हणाले, माझी गरिबीची परिस्थिती होती. ज्येष्ठ संगीतकार रामभाऊ मुकदम व ॲड. आर. डी. देशपांडे यांच्याकडे काम करून शिक्षण घेत होतो. महाविद्यालयात स्नेह संमेलनात भाषण करण्याची स्फूर्ती त्यांनीच दिली. पुढे विद्यार्थी संसदेचा प्रतिनिधी व नंतर दोनवेळा अंबाजोगाई नगर पालिकेत नगरसेवक झालो.