esakal | दूध दरवाढिसाठी भाजपचा राज्यभर महाएल्गार ; रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

bjp protest against maharashtra government milk rate increase

किसान क्रांती मोर्चा, रासप, रयक क्रांती संगटनाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

दूध दरवाढिसाठी भाजपचा राज्यभर महाएल्गार ; रस्त्यावर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध

sakal_logo
By
धनाजी सुर्वे

कोल्हापूर - दुधाला प्रतिलिटर दहा रूपये अनुदान देण्याच्या मगाणीसाठी भाजपने राज्यभर महाएल्गार पुकारला आहे. किसान क्रांती मोर्चा, रासप, रयक क्रांती संगटनाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राज्यभर ठिकठिकाणी दूध रस्त्यावर ओतून देण्यात आले तर काही ठिकाणी गायी रस्त्यावर सोडून महामार्ग रोखण्यात आले आहेत. 

सांगली जिल्ह्यातील दिघंची येथे गायी रस्त्यावर आणत सांगली -कराड महामार्ग रोखण्याच प्रयत्न करण्यात आला. पुण्यातील नायगाव दूध संकलन केंद्रावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 


कोल्हापुरात धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोनल 

दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये व दूध भुकटीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान मिळालेच पाहिजे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले. पंचगंगा नदीच्या उत्तरेस पुलाची शिरोली येथील दर्ग्यासमोर मुंबईच्या दिशेने जाणारे दूध टँकर यावेळी रोखण्यात आले. पोलिस प्रशासनावर अतिरिक्त ताण येणार नाही याची दक्षता आंदोलनकर्त्यांनी घेतली. 

राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत दुधाला सरसकट प्रतिलिटर दहा रुपये व दूध भुकटीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान मिळालेच पाहिजे अशा घोषणा  यावेळी देण्यात आल्या. वाहतूकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेत पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू ठेवली. दुधाचा टँकर येताच धनंजय महाडिक यांनी महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. त्यानंतर सुमारे दहा मिनिटे हे आंदोलन चालले. 
यावेळी माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, पंचायत समिती  सदस्य डॉ. सोनाली पाटील, तालूका अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्य सतिश पाटील, भगवान काटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, संदिप पोर्लेकर, किरण कौंदाडे, आदी उपस्थित होते. 
सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करुन सर्वांना सोडून देण्यात आले. 

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस उपअधीक्षक पद्मजा कदम, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, सुशांत चव्हाण यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

हे पण वाचा - हिम्मत असेल तर तुमच्या संघात दर देऊन दाखवा  

इस्लामपुरला दूध बंद आंदोलनाचा भडका 
दूध दर आंदोलनाला इस्लामपुरात आज हिंसक वळण लागले. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पेठ- सांगली रस्त्यावर येथील बसस्थानक परिसरात ठिय्या मारून म्हणून भजन गात सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भाजपसह त्यांच्या सहयोगी संघटनांनी आज दूध दरासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. इस्लामपूर येथे रयत क्रांतींच्या आंदोलनावेळी संघटनेचे सागर खोत यांना पोलिसांनी अटक केली. आटपाडी तालुक्‍यातील झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिराळा येथेही आंदोलन केले. 

आंदोलन स्थळापासून दूध वाहतूक करणारा टेम्पो दूध घेऊन जाताना त्यांच्या समोर आला. आक्रमक कार्यकर्त्यांनी भजनाचा नाद सोडून घोषणाबाजी सुरू करत टेम्पो अडवून कॅनमधील दूध रस्त्यावर ओतले. पोलिसांचा हस्तक्षेप न जुमानता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध टेम्पो मधील कॅन खाली उतरत रस्त्यावर दूध ओतले. जोरदार घोषणाबाजी केली. काही वेळातच पोलिसांनी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत व त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली. 


शिराळ्यात रस्ता रोको 
 
निष्क्रिय व तिघाडी राज्यकर्त्यांचा धिक्कार असो, गाय दुधास प्रतिलिटर 10 रुपये अनुदान व 30 रुपये दर मिळाच पाहिजे अशा घोषणा देत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शिराळा- इस्लामपूर रस्त्यावर शिराळा तालुका भाजपतर्फे रस्तारोको करण्यात आला. 

यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, सध्याच्या दूध दराने दूध उत्पादकांचा चाऱ्याचा खर्च निघत नाही. जनावरे पाळायची की विकायची हा प्रश्न भेडसावत आहे. पावडर निर्यातीला प्रती लिटर 50 रुपये अनुदान द्यावे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास शेतकरी या सरकारला रस्त्यावर फिरून देणार नाहीत.

सत्यजित देशमुख म्हणाले,दूध व्यवसाय ठप्प झाला तर शेतकऱ्यांना हा व्यवसाय बंद करावा लागेल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला जाईल. महाराष्ट्रात 62 लाख लिटर दूध अतिरिक्त आहे.त्यामुळे प्रती लिटर 10रुपये अनुदान तात्काळ द्यावे. अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू. 

यावेळी भाजपा तालुकाअध्यक्ष सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, महादेव कदम, के.डी. पाटील, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, रणजित कदम, प्रदीप कदम, योगेश कुलकर्णी, अविनाश माळी, प्रा.सम्राट शिंदे,शांताराम जाधव , संभाजी पाटील, विजय महाडिक यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते. 
मांगले,आरळा, शेडगेवाडी,कणदूर,शिरशी, सागाव, फुफिरे फाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. 


दूध दर आंदोलनात चंद्रकांत पाटील आक्रमक; अजित पवारांवर साधला निशाना

''महाविकास आघाडीच्या सरकारची संवेदनशीलता संपली आहे, या सरकारमध्ये शेतकरीपुत्र असलेल्या मंत्रीमहोदयांना जनतेच्या भावना समजतच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी, उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूध धंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. 

भारतीय जनता पक्षाच्यावतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन होत आहे. दूध दरवाढी हे आंदोलन झाले, यावेळी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागळताना पाटील बोलत होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास हे आंदोलन सुरू झाले, या केंद्रावर पाच हजार लिटर दुधाचे संकलन होते. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, लोणावळच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, नितीन मराठे, अविनाश बवरे, गुलाबराव म्हाळस्कर, दत्तात्रेय शेवाळे, शांताराम कदम आदी उपस्थितीत होते. 


श्रीगोंद्यात गरम दूधाचे वाटप करून भाजपाचे आंदोलन

लॉकडाउन काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. दूध व्यवसायाबाबत सरकार शेतकर्‍यांची हेळसांड करीत आहे.  आम्ही ही कष्टाने दूध धंदा करतो. त्यामुळे दूध ओतून देण्याऐवजी गरम दुधाचे वाटप करून सरकारचे दूध व्यवसायाकडे लक्ष वेधीत आहोत, असे सांगत आमदार बबनराव पाचपुते यांनी दूध दरवाढीबाबत आंदोलन केले.

शहरातील शनि चौक येथे आमदार पाचपुते यांच्यासह विक्रमसिंह पाचपुते, दादा ढवाण, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे या प्रमुखांनी आंदोलनात भाग घेतला. कोरोना लॉकडाऊन व श्रीगोंदे शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोनाबाधित रुग्ण संख्या यामुळे पोलिसांनी या आंदोलनाला चार ते पाच लोकांच्याशिवाय परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या आंदोलनात इतर शेतकरी व कार्यकर्त्यांनी बाजूला उभे राहून सहभाग नोंदविला. दूध ओतून देण्याऐवजी गरम करून आणलेले दूध त्यात साखर टाकून आंदोलकांनी उपस्थितांसह  शहरातील काही लोकांना वाटप केले.

अकोल्यात ठिकठिकाणी आंदोलन
 भाजपाच्या वतीने बाळापूर तालुक्यात विविध ठिकाणी दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या व घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठानाचे भरमसाठ विज आकारणी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर करण्यात आला. 

 आज शनिवारी सकाळी आंदोलनाला सुरवात झाली. तालुक्यातील वाडेगाव, निंबा फाटा, पारस व रिधोरा येथे हे आंदोलन करण्यात आले. दुध खरेदी दर ३० रुपये करा, गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये व दुध पावडर निर्यातीला ५० रूपये अनुदान द्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाळापूर व उरळ पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


औरंगाबादमध्ये  महाएल्गार
उद्धव ठाकरे यांची म्हैस काय म्हणते, दुधाला दरवाढ नाही म्हणते, आघाडी सरकार काय म्हणते. दुधाला दरवाढ नाही म्हणते, आघाडी सरकारने केली.., शेतकऱ्यांची बिघाडी...!  अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने दूध डेअरी चौकात दूध दरवाढ विरोधात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. 

शरद पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक 

गायीच्या दुधाला १० रुपये दरवाढ देण्यात यावी, दूध पावडर साठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शहरातील दूध डेअरी चौकात करण्यात आलेल्या एल्गार आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून भाजपच्या वतीने एल्गार करण्यात आला. तर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


म्हणून शेतकरी आत्महत्या करतो - आ. अतुल सावे 
सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. दुधाला भाव नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे. असा आरोप आमदार अतुल सावे यांनी यावेळी केला. 


फिजिकल डिस्टन्स फज्जा 
आंदोलनात घोषणा देते वेळी आणि ठिकाणी मास्क काढले होते. या आंदोलनात आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अदवंत, सविताताई कुलकर्णी, दिव्या मराठे, कचरू घोडके, संजय जोशी, बसवराज मंगरुळे, राज वानखेडे, समीर राजूरकर, बालाजी मुंडे, शिवाजी दांडगे, मनोज पांगारकर, अल्पसंख्यांक मोर्चाप्रदेश अध्यक्ष एजाज देशमुख, जालिंदर शेंडगे उपस्थित होते. 

नाशिक येते मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको

दुधाला अनुदान मिळावं यासाठी दहावा मैल येथे मुंबई आग्रा महामार्गावर भाजप कडून रास्ता रोको करत आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे,खासदार भरती पवार, आमदार राहुल ढिकले व शेतकरी उपस्थित होते,रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर रास्ता पुन्हा वाहतूकिसाठी खुला करण्यात आला. 

बारामतीत राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दुधदर वाढीसाठी आंदोलन

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बारामती एमआयडीसी येथील पेन्सिल चौक दुधाला वाढीव भाव मिळावा यासाठी गरीब जनतेमध्ये दुध वाटून व उर्वरित दुध रस्त्यावरती ओतून शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारचा निषेध करीत दुधाला दरवाढ देण्याची मागणी करण्यात आली. 

यावेळी तालुका अध्यक्ष अ‍ॅड अमोल सातकर म्हणाले, ''दुध दर वाढीसाठी सरकार ला निवेदन दिले, नंतर पांडुरंगाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला तरी, देखील या सरकारला जाग येत नाही. सरकार दुध विषयावर बोलायला देखील तयार नाही. यामुळे आज रस्त्यावर दुध ओतुन देण्याची वेळ आली आहे. कसलं हे सरकार आहे किती आंदोलन केली तरी, या सरकार जाग येत नाही झोपेचे सोंग घेतलेले हे सरकार आहे या पुढे सरकारने दुधाला भाव वाढवून नाही दिला तर अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल आसा इशारा देण्यात आला.''


हिंगोलीत भाजपाचे दूध आंदोलन-आमदार मुटकुळेसह कार्यकर्त्यांना अटक
 
गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर तर दूध पावडरला प्रति लिटर ५० रुपये अनुदान द्यावे आशा विविध मागण्यासाठी भाजपने हिंगोलीसह तालुका पातळीवर शनिवारी (ता. एक) दूध आंदोलन केले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळेसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची अर्ध्या तासानंतर सुटका केली.

भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यभर दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शनिवारी (ता. एक) सकाळी दहाच्या सुमारास भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नांदेड नाका परिसरातील अग्रसेन चौकात महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत, हातात भाजपचे कमळ असलेले झेंडे, फलक दूध आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात ॲड. के. के. शिंदे, रिपाइंचे दिवाकर माने, फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, संजय ढोके, श्याम खंडेलवाल, हमीद प्यारेवाले, उमेश नागरे, अमोल जाधव, डॉ. वसंतराव देशमुख, प्रशांत सोनी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा यशोदा कोरडे यांच्यासह वीस ते तीस कार्यकर्ते सहभागी झाले होते.