निवडणूक आयोगाने दिले ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्विकारण्याच्या सूचना

अविनाश काळे
Tuesday, 29 December 2020

राज्य निवडणूक आयोगाचे मंगळवारी (ता.२९) सांयकाळी प्राप्त झालेल्या आदेशानुसार पारंपरिक पद्धतीने (offline mode) बुधवारी (ता.३०) नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्यातील सुमारे १४ चौदा २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि स्विकारण्यासाठी २४ तासांचा कालावधी राहिल्याने राज्य निवडणूक आयोगाचे मंगळवारी (ता.२९) सांयकाळी प्राप्त झालेल्या आदेशानुसार पारंपरिक पद्धतीने (offline mode) बुधवारी (ता.३०) नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ऐन शेवटच्या टप्प्यात इच्छूक उमेदवारांची धावपळ कमी होणार आहे.

 

 

निवडणूक कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २३ ते ३० डिसेंबर असा आहे. या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे राज्यात एकूण तीन लाख ३२ हजार इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना सोमवारी (ता.२८)  सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण आदी तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत असल्याने इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये. त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पद्धतीने  स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

या निर्णयाच्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना तातडीने पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे व वाढीव वेळेच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. पारंपरिक पद्धतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने  संगणक प्रणालीमध्ये मधून भरुन घेण्यात यावेत असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidate File Nomination Form Through Off line Mode Grampanchayat Election