आता महिलावर्ग करणार 'या' पद्धतीनं चीनवर मात; स्वदेशी दिवाळीसाठी 'कॅट' चे प्रयत्न सुरु..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

सणासुदीच्या दिवसांत भाविकांचे चिनी सजावट साहित्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने ठरविले असून त्यासाठी

मुंबई: सणासुदीच्या दिवसांत भाविकांचे चिनी सजावट साहित्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने ठरविले असून त्यासाठी महिला बचतगट, महिला स्वयंसेवी संस्था, महिला कुटिरोद्योग-लघुउद्योग आदींची मदत घेण्यात येईल. 

गलवान खोऱ्यातील चीनच्या दांडगाईच्या निषेधार्थ कॅट ने चिनी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम वेगवेगळ्या मार्गाने चालवली आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात रक्षाबंधनापासून तुळशी विवाहापर्यंत सण समारंभ असतात. यावर्षी कोरोना व टाळेबंदीमुळे बाजारात सणासुदीच्या दिवसांत नेहमीचा उत्साह दिसणार नाही. पण तरीही सर्व नियम पाळून हे उत्सव मांगल्याने, साधेपणाने आणि स्वदेशी बाण्याने साजरे करावेत, असे आवाहन कॅट च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. 

हेही वाचा: 'तो' मृतदेह आमच्याच नातेवाईकाचा होता का?..बेपत्ता कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांचा सवाल.. 

 

सणांच्या दिवसांत सजावटीच्या साहित्यासाठी भाविकांना मोठ्या प्रमाणावर चिनी मालावर अवलंबून रहावे लागते. चिनी माल स्वस्त असल्याने व्यापाऱ्यांची व ग्राहकांचीही त्यांनाच मोठ्या प्रमाणावर पसंती असते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी कॅट तर्फे प्रयत्न केले जातील. राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्र-दसरा, दिवाळी, छटपूजा, तुळशीविवाह आदी सणांना लागणारे सामान भारतातच तयार होऊन ते स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध व्हावे, असे प्रयत्न राहतील. 

त्यासाठी राज्याराज्यांमील महिला संघटना व कॅट च्या शाखांची मदत घेतली जाईल. सणासुदीला लागणाऱ्या सजावटीच्या व अन्य वस्तूंची यादी केली जाईल. या वस्तूंचे निर्माते-व्यावसायिक, कंपन्या, कारागीर, लघुद्योजक, कुटिरोद्योग, स्टार्टअप यांच्याशी कॅटमार्फत संपर्क करून सजावटीचे किती सामान तयार होईल याचा अंदाज घेतला जाईल. त्या त्या राज्यातली त्या सामानाची निर्मिती व खप किती आहे याची माहिती 15 जुलैपर्यंत मिळवली जाईल. 

हेही वाचा: कोविड मृतदेहांचा खेळ मांडला; गायकवाडांचा मृतदेह सोनावणेंकडे, सोनावणे मात्र जिवंतच..

त्यानुसार त्या त्या राज्यात आवश्यक असलेल्या साहित्याचे उत्पादन करण्यास त्या उत्पादकांना सांगितले जाईल. तेथे उरलेले साहित्य अन्य राज्यात पाठवले जाईल. या साहित्याच्या विक्रीची व्यवस्था कॅट तर्फे केली जाईल तर वाहतुकीची जबाबदारी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनतर्फे उचलली जाईल.

स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहनही कॅटतर्फे केले जाईल. मागीलवर्षी सणासुदीच्या दिवसांत चीनमधून वीस हजार कोटींचे सामान आयात झाले होते. आता स्वदेशीच्या मोहिमेमुळे या आयातील फटका बसेल, असा कॅट चा अंदाज असल्याचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

CAT is planning for trying to encourage women for boycott china products 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAT is planning for trying to encourage women for boycott china products