
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १०० कोटी रुवयांचा दंड वसूल करून इतिहास नोंदविला आहे.
Railway Fine Recovery : मध्य रेल्वेच्या दंड वसुलीतही महिला टीसीची छाप!
मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १०० कोटी रुवयांचा दंड वसूल करून इतिहास नोंदविला आहे. परंतु, या कारवाईत प्रथमच महिला तिकीट तपासणीसांचा तेजस्विनी पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे मुंबई विभाग हा भारतीय रेल्वेतील पहिला विभाग ठरला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय लोकल गाड्या, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. रेल्वेचा तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते २६ फुब्रवारी २०२३ या कालावधीत १८. ०८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत १००. ३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विशेष म्हणजे एसी लोकलमधील २५ हजार ७८१ प्रकरणांमधून ८७. ४३ लाख आणि प्रथम श्रेणी डब्यांमधील १. ४५ लाख प्रकरणांमधून ५.०५ कोटी महसूलाचा समावेश आहे. अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा मुंबई विभाग हा भारतीय रेल्वेतील पहिला विभाग ठरला आहे. या कारवाईत तेजस्विनी पथकातील महिला टीसीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे हे यश गाठणे शक्य झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
तेजस्विनी पथकातील उत्कृष्ट कर्मचारी
- सुधा डी, टीसी : 6,182 प्रकरणांमधून 20.15 लाख दंड
- नम्रता एस, टीसी : 4,293 प्रकरणांमधून 19.88 लाख दंड
- अनिता खुराडे, टीसी : 5,371 प्रकरणांमधून 19.26 लाख दंड
- चित्रा वाघचौरे, टीसी : 5,523 प्रकरणांमधून रु. 14.82 लाख दंड
- दीपा वैद्य, टीसी ४,१३४ प्रकरणांमधून रु. १५.७७ लाख दंड