MHT-CET परीक्षा तालुक्याच्या ठिकाणी होणार? सीईटी सेलने सुरू केल्या हालचाली!

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 24 January 2021

२०२१ या वर्षातील ‘सीईटी़’चे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. मात्र तालुका स्तरावर परीक्षा घेण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.

पुणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासावर मर्यादा आल्याने आता यंदा होणारी ‘एमएचटी-सीईटी़’ तालुकास्तरावर घेण्यासाठी उच्चतंत्र शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी तालुका स्तरावरील संस्थांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका संस्थेमध्ये किमान १०० विद्यार्थ्यांची क्षमता असावी असे या आदेशात नमूद केले आहे.

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. यापूर्वी ही परीक्षा जिल्ह्याच्या ठिकाणी घेतली जात होती. पण कोरोनामुळे विद्यार्थ्यांना दूरच्या अंतरावर जाऊन परीक्षा देणे शक्य नव्हते त्यामुळे तालुकास्तरावर ही परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी ‘सीईटी़ सेल़़’ने प्रयत्न केले. त्यानंतर राज्यातील ३६ जिल्ह्यात १८७ ठिकाणी व महाराष्ट्राबाहेर १० ठिकाणी परीक्षा घेतली होती. अनेक तालुक्यातील माहिती व्यवस्थित संकलित झालेली नव्हती.

शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले; शरद पवारांना केली विनंती​

२०२१ या वर्षातील ‘सीईटी़’चे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. मात्र तालुका स्तरावर परीक्षा घेण्यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी सीईटी सेलने तंत्र शिक्षण विभागाकडून माहिती मागविली आहे. त्यानुसार तंत्र शिक्षण विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे. पुणे विभागीय तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. द.व्यं. जाधव यांनी देखील परिपत्रक काढले असून, तालुकास्तरावर परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यासाठी शासकीय आणि शासन अनुदानित संस्थांकडून माहिती मागविली आहे. त्यात सीईटी परीक्षेसाठी आवश्‍यक सोईसुविधा व प्रवेश क्षमतेची माहिती असणार आहे. संपूर्ण राज्यातील माहिती संकलित झाल्यानंतर परीक्षा केंद्र निश्‍चित केले जाणार आहेत.

शशिकांत शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा​

दृष्टीक्षेपात २०२० एमएचटी-सीईटी

नोंदणी केलेले विद्यार्थी - ५,४२,४३१
परीक्षा देणारे विद्यार्थी - ३,८६,६०४
अनुपस्थित विद्यार्थी - १, ५५, ८२७
एकूण परीक्षा केंद्र - १९७

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CET cell started preparations to conduct CET exam at taluka level this year