मध्य महाराष्ट्रासह कोकणात तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाची शक्‍यता;पुण्यात उन्हाचा चटका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या गुरुवारपासून (ता. 7) ते शनिवारपर्यंत (ता. 9) काही भागात पाऊस पडेल. विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे - मध्य महाराष्ट्रासह कोकणात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडटासह पाऊस पडेल. पुण्यातही आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज बुधवारी हवामान खात्याने वर्तविला. 

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिण, मध्य अरबी समुद्रापासून उत्तर, मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावाही होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या गुरुवारपासून (ता. 7) ते शनिवारपर्यंत (ता. 9) काही भागात पाऊस पडेल. विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

'आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे, पण...'; शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सातत्याने बदलणाऱ्या लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमी झालेली थंडी, पहाटे पडणारे धुके आणि दुपारी ढगाळ हवामान अशी स्थिती कीड-रोगांसाठी पोषक ठरत आहे. राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे सावट असून, शनिवारपर्यंत विविध भागांत ढगाळ हवामानासह हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. 

धक्कादायक ! कात्रज प्राणीसंग्रहालयातील ४ हरणांची 'शिकार'; जबाबदार कोण?

राज्यात डिसेंबर महिन्यात उत्तर भारतातील थंडीने हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रातही गारठा वाढला. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आली. मात्र, ही थंडी फार काळ टिकली नाही. सध्या ढगाळ हवामानामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. 

होळकरांची वास्तू रयतकडून ताब्यात घ्यावी; आमदार पडळकरांची मागणी

राज्यातील जवळपास सर्वच भागांत किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमान 15 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवस राज्यात थंडी कमी स्वरूपाची राहणार आहे. बुधवारी (ता. 6) सकाळी आठ वाजेपर्यंत महाबळेश्‍वर 15.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज ः 
गुरुवार :
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, बीड, लातूर. 
शुक्रवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ. 
शनिवार : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर. 

पुण्यात उन्हाचा चटका 
शहरात बुधवारी उन्हाचा चटका लागत होता. गेल्या तीन दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण कमी झाले होते. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला. कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 2.1 अंश सेल्सिअसने वाढून 31.1 अंश सेल्सिअस नोंदला जाता. किमान तापमानाचा पारा 17.9 अंश सेल्सिअस नोंदला. सरासरीपेक्षा 7.3 अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of rain in next three days in Central Maharashtra Konkan