धक्कादायक ! कात्रज प्राणीसंग्रहालयातील ४ हरणांची 'शिकार'; जबाबदार कोण?

अशोक गव्हाणे
Wednesday, 6 January 2021

उद्यानात काम सुरू झाल्यापासून भटक्या कुत्र्यांना उद्यानात काही ठिकाणांहून सहज प्रवेश करता येत आहे. काम चालू झाल्यापासून याआधीही कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या १५ ते २० घटना घडल्या आहेत.

कात्रज (पुणे) : कात्रज प्राणीसंग्रहालयात ४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्या वेळी प्राणीसंग्रहालयात प्रवेश करून हरणांचा कळप असलेल्या खंदकात २ नर आणि २ मादी अशा एकूण ४ हरणांची शिकार केली आहे. कुत्र्यांच्या या हल्ल्यात आणखी १ हरिण गंभीर जखमी झाले आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती प्राणीसंग्राहलयातील कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना मिळेपर्यंत त्या हरणांचा फडशा पाडला होता. सदरच्या कुत्र्यांना डॉग स्कॉडमार्फत भूल देऊन पकडण्यात आले आहे. 

'आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे, पण...'; शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता

संग्रहालयात एकूण ३४ हरणे आहेत. कात्रज गावठाण बाजूकडील उचकटलेल्या पत्र्यांच्या खालून भटक्या कुत्र्यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला. पेशवे तलावाकडून येणाऱ्या ओढ्याचे काम करताना सुरक्षितता बाळगली नसल्याने, त्या ठिकाणी पडलेल्या भगदाडा मधून कुत्र्यांनी प्रवेश केला असल्याचे उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पत्र्याच्या मोकळ्या जागेतून भटक्या कुत्र्यांनी प्रवेश करत जवळच असलेल्या हरणांचे खंदक असलेल्या जागेवर जात हरणांवर हल्ला चढवला. त्यातच ४ हरणांचा मृत्यू झाला तर १ हरिण गंभीर जखमी झाले आहे.

पुण्यातील IISERचे तीन शास्त्रज्ञ Indian Academy of Sciencesचे फेलो

संग्रहालयात पुणे महापालिकेतर्फे ड्रेनेज वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणीसंग्रहालय मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर याकडे दुर्लक्ष होत आहे. आता या घटनेला ठेकेदार, संग्राहलयाचे प्रशासन की सुरक्षा देणारे शिपाई? नेमके जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

साधरणतः प्राणी संग्रहालयात वर्षाला 20 लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. पुणे महापालिका वर्षाला ६ ते ७ कोटी रुपये खर्च करून कोणत्या सुविधा दिल्या जातात हा खरा प्रश्न आहे. हरणांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच, येणाऱ्या महापालिका मुख्यसभेत हा प्रश्न उपस्थित करून, प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास, यावरती कायदेशीर मार्ग निवडला जाईल.  
- युवराज बेलदरे, नगरसेवक

उपमुख्यमंत्री अजित पवार MPSCमध्ये लक्ष घालणार; रोहित पवारांच्या पत्राला दिला रिप्लाय​

उद्यानात काम सुरू झाल्यापासून भटक्या कुत्र्यांना उद्यानात काही ठिकाणांहून सहज प्रवेश करता येत आहे. काम चालू झाल्यापासून याआधीही कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या १५ ते २० घटना घडल्या आहेत. परंतु, प्रत्येकवेळी संग्राहलयातील प्राण्यांचे रक्षण करण्यात आम्हाला यश आले होते. परंतु, यावेळी सुरक्षा कर्मचारी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत ४ हरणांचा मृत्यू झाला होता. हरणांचा मृत्यू हा भेदरून झाला असून कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी घडलेली घटना दुःखद आहे.
- डॉ. राजकुमार जाधव, संचालक, स्व. राजीव गांधी प्राणी संग्रहालय

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 deer have died at Katraj Zoo and wildlife research center at Pune