
महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ..; काय म्हणाले पाटील?
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आलं होतं. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray Resigns) यांनी राजीनामा दिलाय. मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळं राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली होती.
एकनाथ शिंदे यांनी बंड करत चाळीसहून अधिक आमदार सुरुवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला घेऊन जात बंड केला. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) अल्पमतात आलं होतं आणि या सगळ्या राजकीय नाट्यानंतर काल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आज 30 जून रोजी फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काल सायंकाळी पाच वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि उद्याच (30 जून) बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीमान्यामुळं आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी बोलणी सुरु केलीय. तर, दुसरीकडं महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजपाच्या (BJP) गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
हेही वाचा: ठाकरे सरकार पडताच सुप्रिया सुळेंनी कापला केक; राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिलीय. हिंदुत्त्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती, अशी खोचक टीका पाटलांनी केलीय. उद्धव ठाकरे जर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले नसते, तसेच त्यांनी हिंदुत्वाची भूमिका धरून ठेवली असती, तर ही वेळ आली नसती. सरकार बनवण्याचा दावा कधी करणार त्यावर निर्णय व्हायचा बाकी आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीशी बोलून यासंदर्भात निर्णय घेऊ. अजून याबाबत कोणता निर्णय घेतलेला नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
हेही वाचा: 'हिंदुत्व.. हिंदुत्व म्हणणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी आहेत'
एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहोत हे स्पष्टच आहे. हा दिवस अचानक आला आहे. नाहीतर उद्याचा पूर्ण दिवस टेन्शनमध्ये गेला असता. आता एक दिवस रिलॅक्स मिळाला आहे. बसून चर्चा करू आणि नंतर ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर, दुसरीकडं भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिलीय. आता आमचा संघर्ष शिवसेनेशी नसेल तर, आगामी काळात आमचा संघर्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी असणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Web Title: Chandrakant Patil Reacted To The Resignation Of Uddhav Thackeray And The New Bjp Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..