
माझ्यासोबत आलेल्या सर्व तरुण शिवभक्तांना जो पर्यंत किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका संभाजीराजेंनी घेतलीये.
Shiv Jayanti : शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला; CM शिंदेंनी नाराज झालेल्या संभाजीराजेंना केलं 'हे' आवाहन
Shivaji Maharaj Jayanti 2023 : शिवजन्माचं ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यास उपस्थित आहेत.
राज्य सरकारच्या वतीनं या शासकीय सोहळ्याचं आयोजन केलं जातं. राज्याच्या पर्यटन विभागाच्या वतीनं दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन केलं जातं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरतो. लाखो शिवप्रेमी या निमित्त शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात. शिवनेरी किल्ल्यावर संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित आहे. मात्र, माझ्यासोबत आलेल्या सर्व तरुण शिवभक्तांना जो पर्यंत किल्ल्यावर प्रवेश देत नाही, तो पर्यंत मी देखील किल्ल्यावर येणार नसल्याची भूमिका संभाजीराजेंनी घेतलीये. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समजून काढण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, शिवनेरी किल्ल्यावर नियोजनाचा अभाव असल्याचा आरोपही संभाजीराजेंनी केला.
दरम्यान, संभाजीराजेंच्या भूमिकेवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'छत्रपती संभाजीराजेंना माझी विनंती आहे. आपल्या भावना आम्ही ऐकल्या आहेत. हे तुमचंच सरकार आहे. शिवाजी महाराजांच्या विचारावर हे सरकार स्थापन झालंय. आपल्या भावनांची आणि शिवभक्तांच्या भावनांची आम्ही कदर करतो.'
शिवनेरी प्रवेश, दर्शनाबद्दल आपण भावना व्यक्त केल्या याची नोंद मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलीये. रायगडावर जोमात काम सुरु आहे, त्यात तुम्ही पुढाकार घेतलेला आहे. या राज्यातील जेवढे गडकोट किल्ले आहेत, इतिहास आहे तो जपण्याचं सरकार काम पूर्णपणे प्रयत्न करेल. पुढच्या वर्षी योग्य प्रकारे नियोजन सगळ्यांना विश्वासात घेऊन केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.