
पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी चित्रा वाघांचं पवारांना साकडं
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या नेत्याने अत्याचार करूनदेखील मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. पोलिस त्याला सहज जामिन मिळवून देतात. त्यामुळे आता या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच लक्ष घालावे असे साकडे घालणार असल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले.
दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व पोलिस तपास करत असल्याने यावर मी काही बोलणार नाही, असे शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. पुण्यात भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. माजी नगरसेवक धनंजय जाधव, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या, शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या मुलींवर अत्याचार केले. तिला न्याय मिळावा यासाठी तिने अनेकांकडे मदत मागितली. पण एकानेही तिला मदत केली नाही. ती शरद पवार यांच्याकडेही जाणार होती, पण तिला जाऊ दिले नाही. या तरुणीने पोलिसांकडे सर्व पुरावे तिने दिले. तरीही कुचिक यांना लगेच जामीन कसा मिळाला? पुणे पोलिस आणि सरकारी वकील काय करत होते? पूजा चव्हाण प्रकरण असो की कुचिक प्रकरण यात पुणे पोलिस कायमच गुन्हेगारांना मदत करण्याचेच काम करत आहे. अशी टीका वाघ यांनी केली.
महिला आयोगाला अंगणातील घटना दिसत नाही का ?
रघुनाथ कुचिक यांनी अत्याचार केलेली केस पुण्यातच घडली आहे, इतर शहरात कुठेही नाही. यामध्ये राज्य महिला आयोगाने स्वतःहून लक्ष घालण्याची गरज होती. पण या आयोगातील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या अंगणात काय घडतंय हे दिसत नाही का? तुम्ही काम करणाऱ्या महिला आहात म्हणून तुम्हाला पदावर बसवले आहे, जर बाईपणाला जागा अशी टीका वाघ यांनी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव न घेता केली.