शाळा व्यवस्थापन समित्यांचे छाटले पंख? विद्यार्थ्यांना सरसकट गणवेश नाही; दरवर्षी २ गणवेश, यंदा एकाचेच पैसे आले

बालपणीच चिमुकल्यांच्या मनात एकमेकांबद्दल दुजाभाव निर्माण होऊ नये, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातील,अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली होती.
school uniforms
school uniformsesakal

सोलापूर : बालपणीच चिमुकल्यांच्या मनात एकमेकांबद्दल दुजाभाव निर्माण होऊ नये, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातील,अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली होती. पण, शाळा सुरु होण्याच्या तोंडावर हा निर्णय बदलला गेल्याचे दिसते. आता पूर्वीप्रमाणेच एससी, एसटी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांनाच यंदाही गणवेश मिळणार आहे.

शाळा सुरु होण्याच्या ऐनवेळी गणवेश वाटपसंदर्भात यापूर्वीचाच निर्णय राबविण्याचे ठरवून तशी अंमलबजावणी सुरु केली. बालपणीच एकमेकांबद्दल दुजाभावाची भावना निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर, सरसकट सर्वांना गणवेश देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सरकारने जाहीर केला. पण, सरसकट गणवेश देण्याच्या वल्गना जणू हवेत विरल्या. दुसरीकडे एसटी अन् आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना दोन गणवेश मिळणार नाहीत.

सध्या केवळ एकाच गणवेशाचे पैसे शासनाकडून प्राप्त झाले आहेत. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विशेषतः पहिलीत येणाऱ्यांचे मोठ्या थाटात स्वागत केले जाते. जेणेकरून त्यांना शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी, शाळा व शिक्षकांविषयी भीती मनात राहणार नाही हा हेतू असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला जातो. सद्य:स्थितीत इंग्रजी माध्यमांच्या शाळा शहराबरोबरच गावोगावी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील बहुतेक विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातीलच असतात ही वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच मुलांना सरसकट दोन गणवेश देण्याची घोषणा केली. त्यांच्याच शाळेतील एकाला गणवेश मिळाला अन् दुसऱ्याला नाही, यातून मुलांमध्ये दुजाभाव निर्माण होणार नाही हा त्यामागील हेतू होता. पण, त्यानुसार अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.

जिल्हा परिषद शाळांची स्थिती

  • एकूण शाळा

  • २,७९५

  • प्रवेशित विद्यार्थी

  • २.०६ लाख

  • गणवेश मिळणारे विद्यार्थी

  • १.५४ लाख

  • गणवेशासाठी प्राप्त निधी

  • प्रत्येकी ३०० रुपये

शिक्षक भरतीचा पत्ता नाही, बदल्याही थांबल्या

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात विशेषतः: जिल्हा परिषद शाळांमध्ये ३६ ते ३८ हजार पदे रिक्त आहेत. एकीकडे गुणवत्तेवरून झेडपी शाळांची पटसंख्या कमी होत असतानाच दुसरीकडे टेट परीक्षेनंतर लाखो तरूण-तरुणी शिक्षक भरतीची वाट पाहत असतानाही पदभरती होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या ग्रामविकास विभागाकडून ऑनलाइन होत आहेत. पण, त्याची प्रक्रिया देखील सध्या थांबलेली आहे. संच मान्यता अजूनही झालेली नाही.

दुसऱ्या गणवेशात शासनाकडूनच अट्टहास कशाला?

दरवर्षी शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. त्यासाठी शासनाकडून प्रत्येकी ६०० रुपयांचा निधी मिळतो. शिक्षणाधिकाऱ्यांकडून तो निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात वर्ग करून त्यांच्या माध्यमातून गणवेश दिले जात होते.

पण, आता गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तो निधी थेट संबंधित कपडे शिवणाऱ्या टेलरच्या खात्यात वर्ग होणार आहे. त्यासाठी त्या मुख्याध्यापकांना गणवेशासंबंधीच्या पावत्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समित्यांचे पंख छाटल्याची चर्चा आहे. त्यातच आता दुसरा गणवेश स्काऊट गाईडच्या धर्तीवर दिला जाणार आहे, पण तो शासनाकडूनच थेट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, शाळा व्यवस्थापन समितीकडून दोन गणवेश दिले जात असताना पुन्हा हा अट्टहास का व कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com