

Cold Wave Warning Maharashtra
esakal
Maharashtra Weather Udpate : डीटवाह चक्रिवादळाच्या स्थितीनंतर पुन्हा राज्यात किमान तापमानात घट होताना पहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक निच्चांकी तापमान धुळे जिल्ह्यात असून ७.६ तापमानाची मागच्या २४ तासांत नोंद झाली आहे. तापमानात सातत्याने होत असलेल्या घटीमुळे गारठा वाढू लागला आहे.
रविवारी (ता. ७) अमरावती, गोंदिया आणि नागपूर येथे थंडीची लाट नोंदली गेली. आज (ता. ८) पूर्व विदर्भातील वर्धा, भंडारा आणि गोंदिया येथे पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली गेल्यास किंवा सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी घसरल्यास ‘थंडीची लाट’ मानली जाते.
उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसत आहे. पहाटे धुक्याची दुलई, गार वारे आणि कडाक्याची थंडी अशी स्थिती अनेक भागांत निर्माण झाली आहे. धुळे कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.६ अंश तापमान नोंदले गेले. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ८ अंश तापमानाची नोंद झाली. तर गोंदिया, नागपूर, अमरावती, भंडारा आणि जेऊर येथे १० अंश किंवा त्यापेक्षा कमी तापमान नोंदल्याने हुडहुडी वाढली आहे.