
राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात
सोलापूर : कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त होत असतानाच १ ते २४ एप्रिल या काळात राज्यातील तब्बल २५ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये मागील २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत.
राज्यात मार्च २०२० च्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या आहेत. आतापर्यंत राज्यातील ७८ लाख ७६ हजार ८४१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एक लाख ४७ हजार ८३४ जणांचा कोरोनाने जीव घेतला. पण, कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोर्बोवॅक्स या प्रतिबंधित लसीमुळे कोरोनाची धार बोथट झाली आणि मृत्यूवर नियंत्रण आले. दुसरीकडे शासनाच्या निर्बंधांमुळेही कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मोठी मदत झाली. मागील २४ दिवसांत राज्यात अडीच हजार रुग्ण वाढले, पण दिलासादायक बाब म्हणजे १ ते २४ एप्रिल या काळात २० सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. १ एप्रिलला राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९३७ होती तर २४ एप्रिलला ती ९१६ पर्यंत खाली आली आहे.
कोरोनाचा धोका टळलेले जिल्हे
एप्रिल महिन्यात मुंबई, रायगड व धुळे या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची थोडीशी वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ११ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर, गोंदिया व गडचिरोली या १६ जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग एप्रिलमध्ये वाढलेला नाही.
Web Title: Corona Infection Control State Low Number Patients Districts Eleven Districts Free Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..