महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे 10 हजार नवे रुग्ण

सूरज यादव
Wednesday, 22 July 2020

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी इतर आकडेवारी दिलासा देणारी आहे.

मुंबई - कोरोनाचा महाराष्ट्रात कहर वाढतच चालला आहे. राज्यात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 10576 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 37 हजार इतकी झाली आहे. भारतातील एकूण रुग्णांची संख्या जवळपास 12 लाख झाली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 28 हजार 700 वर पोहोचला आहे.  महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले असून पहिल्यांदाच एका दिवसात 10 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या 24 तासात राज्यातील 280 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून ती 3 लाख 37 हजार 607 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे 12556 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही बुधवारी 1310 कोरोना रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 4 हजार 678 इतकी झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत 5875 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हे वाचा - स्वाइन फ्ल्यूच्या 11 वर्षातील रुग्णसंख्येच्या पाचपट कोरोना संसर्ग अवघ्या वीस दिवसांत

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी इतर आकडेवारी दिलासा देणारी आहे. कोरोनाचा मृत्यूदर आणखी घटून तो 2.4 टक्के तर, त्याच वेळी बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६२.२ टक्के झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. दरम्यान, कोरोना संक्रमणाचा वेग रोखण्यात यश मिळवणाऱ्या राजधानी दिल्लीत दर महिन्यात किमान एकदा सीरोलॉजी चाचण्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्राच्या म्हणण्यानुसार देशात बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण पहाता भारताने ‘कोविड-१९’ संसर्गाचा वेग रोखण्यात अपेक्षित कामगिरी केली आहे. दर दिवशी आढळणाऱ्या नव्या कोरोनाग्रस्तांच्या व बरे होणाऱ्यांच्या संख्येतील अंतर दिवसेंदिवस वाढत चालल्याचे सांगून आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील ७ लाख २४ हजार ५७८ सक्रिय कोरोनाग्रस्त आतापर्यंत बरे झाले आहेत. बरे होणाऱ्यांची टक्केवारी ६२ टक्‍क्‍यांवर गेली आहे. सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या घटून ४ लाख २ हजार २५९ झाली आहे. भारतात प्रती दहा लाखांमागे सक्रिय रूग्ण जागतिक सरासरीच्याही कमी म्हणजे ८३७ इतके आढळत आहेत. ३० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतही सक्रिय रूग्णसंख्येचा आलेख उतरता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona updates maharashtra cross 10 thousand patient in one day