सोलापूरला दररोज पाणीपुरवठा! नव्याने टाकली जाणार ७१५ किमी पाइपलाइन; १५ ते ३२ लाख लिटरचे असतील २९ जलकुंभ; ८९२ कोटींपैकी २०० कोटी रोख्यातून उभारले जाणार

राज्य सरकारने सोलापुरात पाणीपुरवठा दररोज व्हावा, यासाठी ८९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन ते तीन वर्षांत हे काम पूर्ण होऊन सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. हद्दवाढ भागात तब्बल ६५० किलोमीटर तर अन्य ठिकाणी ६५ किलोमीटर पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी जागतिक बॅंकेकडील ६०० कोटी महापालिकेला मोफत असून महापालिका २०० कोटी रुपये रोख्यातून उभारणार आहे.
solapur
cashsakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने सोलापुरात पाणीपुरवठा दररोज व्हावा, यासाठी ८९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन ते तीन वर्षांत हे काम पूर्ण होऊन सोलापूरकरांना दररोज पाणी मिळणार आहे. हद्दवाढ भागात तब्बल ६५० किलोमीटर तर अन्य ठिकाणी ६५ किलोमीटर पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार जागतिक बॅंकेकडील ६०० कोटी महापालिकेला मोफत देणार असून महापालिका २०० कोटी रुपये रोख्यातून उभारणार आहे.

सोलापूर शहरात २५ वर्षांपूर्वी म्हणजेच २००० साली पहिल्यांदा एक दिवसाआड पाणीपुरवठा झाला. त्यानंतर विविध अडचणींमुळे पाण्याचे दिवस वाढले आणि आता चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पण, आता गरजेच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या व अंतर्गत पाइपलाइन टाकली जाणार असल्याने शहराला दररोज पाणी मिळणार आहे.

यासंदर्भात उद्या (सोमवारी) बैठक होणार असून २२ डिसेंबरला आणखी एका बैठकीचे नियोजन केले आहे. त्यानंतर निविदा प्रसिद्ध होईल. एक महिन्यानंतर निविदा उघडून कामाला सुरवात होईल, असे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे काम डिझाईन, बिल्ड आणि ऑपरेशन (डीबीओ) अशा पद्धतीचे असणार आहे. त्यानुसार ठेकेदार कामाचा आराखडा सादर करेल, त्यानंतर प्रत्यक्षात काम करून किमान दहा वर्षे या कामाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडेच असणार आहे.

हे काम ‘डीबीओ’ तत्त्वावर होणार

सोलापूर शहराला दररोजच्या पाणीपुरवठ्यासाठी ८९२ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यासाठी पालकमंत्र्यांसह स्थानिक आमदारांचा पाठपुरावा महत्त्वाचा होता. आता ६०० कोटी रुपये जागतिक बॅंकेकडून मिळणार असून २०० कोटी रुपये बॉण्ड तथा रोख्यातून उभारले जाणार आहेत. ९२ कोटी रुपये महापालिका उपलब्ध करून देणार आहे. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हे काम मुदतीत पूर्ण होईल. ‘डीबीओ’ तत्त्वावर हे काम होईल.

- व्यंकटेश चौबे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

१५ ते ३२ लाख लिटरच्या २९ टाक्या

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत चालावा, यासाठी उंचावर २३ पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) बांधल्या जाणार आहेत. १५ ते ३२ लाख लिटर क्षमतेच्या या पाण्याच्या टाक्या असणार आहेत. तसेच सहा मुख्य टाक्या बांधल्या जाणार असून त्याची क्षमता प्रत्येकी २० लाख लिटर असणार आहे. दुसरीकडे पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा लागणार असून त्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्लीला पाठविला आहे. महिनाभरात जागा ताब्यात मिळेल आणि काम सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोख्यातून गुंतवणूकदारांना मिळणार व्याज परतावा

पाइपलाइनच्या कामासाठी महापालिका २०० कोटींचा निधी रोख्यातून उभारणार आहे. त्यासाठी एजन्सीच्या माध्यमातून लोकांकडून शेअर्स तथा रोखे घेतले जातील. त्या गुंतवणूकदारांना मुद्दल परत मिळेपर्यंत बॅंकांप्रमाणे व्याजाचा परतावा दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com