वीज कोसळून होणारे नुकसान टाळण्यासाठी 'हे' अॅप देणार तुम्हाला सूचना...

मतीन शेख
Tuesday, 14 July 2020

‘दामिनी’ हे ॲप मार्गदर्शक ठरणार...

कोल्हापूर - पावसाळ्यात तसेच वादळात वीज कोसळून होणाऱ्या हानीसंदर्भात आगाऊ सूचना देणारे ‘दामिनी’ हे  मोबाईल ॲप हवामान शास्त्र विभागाने विकसित केले आहे. वीजप्रवण क्षेत्रात काय करावे, काय करू नये याबाबत ‘दामिनी’ हे  ॲप मार्गदर्शक ठरणार आहे.

पावसाच्या आधी आकाशात होणारा कडकडाट आणि याच  कडकडाटात वीज कोसळून होणारी हानी टाळता येण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी या वेळी काय करावे, काय करू नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी 'दामिनी' हे ॲप तयार केले आहे.राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हास्तरावर वीज कोसळून होणाऱ्या हानी संदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत.

वीज पडून झालेल्या नुकसानाची होणार नोंद

IMD व IITM यांनी विकसित केलेल्या दामिनी या ॲपबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे. वीज पडून मृत्यू झालेल्या मनुष्य/ जनावरे यांची नोंद घेऊन त्यांची माहिती राज्य शासनास सादर केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने वीज कोसळून होणाऱ्या आपत्तीबाबत कृती आराखडा तयार करत IMD /IITM यांच्या संकेतस्थळावर संभाव्य वीजप्रवण क्षेत्राबाबत सुधारित सूचना प्रसारित केल्या जाणार आहेत.

वाचा - पश्‍चिम घाटाची निर्मिती ज्वालामुखीच्या विवरातून तर जलजन्य खडक आढळतात या भागात...

वीज कोसळून होणाऱ्या हानीबाबतचे होणार केस स्टडी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून ‘वीज कोसळणे’ या आपत्ती संदर्भात काय करावे, काय करू नये याबाबत ध्वनिफीत व लघुचित्रपट प्रसारित केले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने वीज कोसळून होणारी हानी कमी करण्यासाठी वीजरोधक यंत्रणा व वीज प्रवण क्षेत्राबाबत आगाऊ सूचना देणारी व त्या संदर्भात सतर्कता देणाऱ्या सूचना प्रसारित करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे, यासारख्या दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येणार असुन जिल्ह्यामधील वीज कोसळून होणाऱ्या हानीबाबतचे केस स्टडी व प्रभावी उपाय योजनांचे दस्तऐवजीकरण करत अहवाल राज्य शासनास सादर करण्या संदर्भात सूचना केल्या आहेत.

कसे आहे हे दामिनी ॲप...

हे ॲप स्मार्ट फोनवर डाऊनलोड करता येणार आहे.या ॲप मध्ये आपल्या लोकेशननुसार हवामान तसेच वीजांच्या शक्यतांचे अलर्ट वापरकर्त्यास आपल्या मोबाईलवर मिळवता येणार आहेत.तसेच वीजाच्या कडकडात कोणती काळजी घ्यावी या संबंधी सुचना या ॲपच्या माध्यमातून दिल्या जातात.

खालिल लिंक वर हे ॲप डाऊनलोड करता येईल

https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini

पावसाळ्याच्या कालावधित वीज पडल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिकांनाही धोका पोहचू शकतो. हा धोका टाळण्यासाठी लोकांना सूचित करण्याचे काम या ॲपद्वारे केले जाणार आहे.तरी शेतकरी तसेच सर्वांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

 प्रशांत सातपुते - जिल्हा माहिती अधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: damini lighting alert app instructions to prevent damage