राज्याच्या मत्स्य उत्पादनात गेल्या 45 वर्षातील सर्वात मोठी घट; सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

राज्यात 2019 मधील मत्स्य उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्के घट झाली आहे.

मुंबई: राज्यात 2019 मधील मत्स्य उत्पादनामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्के घट झाली आहे. 'सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटने (सीएमएफआरआय)  प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. गेल्या 45 वर्षांमधील ही सर्वात मोठी घट आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आलेल्या वादळांमुळे मासेमारीत घट झाल्याचे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. 

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, भारताचे 2019 मध्ये मत्स्यउत्पादन हे 3.56 दशलक्ष टन नोंदवले गेले आहे. 2018मध्ये  महाराष्ट्राचे मत्स्यउत्पादन 2.95 लाख टन होते. मात्र, 2019  मध्ये 32 टक्क्यांनी घट होऊन ते 2.01लाख टनावर आले. सर्वाधिक मत्स उत्पादनामध्ये तामिळनाडू प्रथम क्रमांकावर असून 7.75 लाख टन, गुजरात दुसऱ्या स्थानावर असून त्याचे उत्पादन 7.49 तर तिसऱ्या क्रमांकावर केरळ राज्य असून त्याचे उत्पादन 5.44 आहे. देशातील मत्स उत्पादनामध्ये राज्याचा वाटा 5.4 टक्के आहे. 

हेही वाचा: 'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान 

महाराष्ट्राचे मत्स्यउत्पादन कमी होण्यास गेल्यावर्षी राज्याच्या सागरी परिक्षेत्रात धडकलेली वादळे आणि त्यामुळे खराब झालेले हवामान कारणीभूत असल्याचे माहिती मुंबई सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ प्रमुख डाॅ.अनुलक्ष्मी चिल्लपन यांनी दिली. गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या मासेमारीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या महिन्यांमध्ये खराब हवामानामुळे मच्छीमारांना 50 दिवस मासेमारी करता आली नाही. म्हणजे मासेमारीच्या एकूण दिवसांमधील 35 टक्के दिवस मासेमारी न झाल्याने मत्स्यउत्पादनात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. 

सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये महाराष्ट्रात 87.4टक्के यांत्रिकीकृत, 12.4टक्के मोटार संचलित आणि केवळ 0.2 टक्के पारंपारिक मासेमारीच्या नौकांनी मासेमारी झाली.  राज्यातील मत्स्यउत्पादनाची ही नोंद मासळी उतरविण्याच्या 158  केंद्रावरुन करण्यात आली. 2019 मध्ये ट्राॅल जाळीने 55 टक्के, डोलने 23  टक्के, पर्ससीन जाळीने 15  टक्के आणि गिलनेटने 7 टक्के मासेमारी झाली. राज्यात करंदी-जवल्याची सर्वाधिक मासेमारी(21%) २०१९ मध्ये राज्यात झाली.

 त्यापाठोपाठ कोळंबी (9 %), बोंबील (8.2 %), ढोमा (8.2 %), बांगडा (6.9 %) या माशांची मासेमारी झाली आहे. महाराष्ट्राच्या मत्स्यउत्पादनात ४० टक्के वाटा हा मुंबई शहराचा असून त्यापाठोपाठ रायगड आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो. गेल्या काही वर्षापासून राज्याच्या मत्स उत्पादनात घट होत आहे. या वर्षी सर्वात मोठी घट झाली. याचे प्रमुख कारण म्हणजे राज्य सरकारचे मासेमारीचे धोरण आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर यांनी म्हटले. 

राज्यात अवैधरित्या एलईडी लाईट व पर्ससीन बोटींद्वारे होणाऱ्या मासेमारीवर राज्य सरकारचा अंकुश नाही. त्याच्यावर कारवाई केली जाते. या द्वारे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. पारंपारिक मासेमारी ही भरती, ओहोटीच्या वेळेनुसार केली जाते. त्यामध्ये येणारे मासे पकडले जातात. पण पर्ससीनमध्ये जीपीएस व तंत्रज्ञानामुळे माशांच्या साठे कुठे उपलब्ध आहे याची माहिती मिळल्याने सरसकट मासेमारी होते. त्यामुळे माशांना प्रजनानावर परिणाम होऊन माशांचे उत्पादन घटते, असे तांडेल म्हणाले. 

सर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात...

तसेच गेली काही वर्षात समुद्रामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले. अनेक कंपन्यांचे रसायने समुद्रात सोडली जातात. तसेच कांदळवनाची कत्तल करून समुद्रावर भर टाकली जात आहे. त्यामुळे माशांना प्रजनानासाठी समुद्र किनारे सुरक्षित नाही. यामुळेही मत्स उत्पादनात घट होत आहे, असे दामोदर तांडेल यांनी सांगितले.

decreased in production of fish in maharashtra 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decreased in production of fish in maharashtra