राज्यातील डॉक्‍टरांच्या संघटनांची एकी ! प्रश्‍न सोडवण्यासाठी सुकाणू समिती स्थापण्याच्या हालचाली 

प्रकाश सनपूरकर 
Tuesday, 15 September 2020

राज्यातील "निमा' आणि "आयएमए' महाराष्ट्र शाखा यांच्या पुढाकाराने नुकतीच वेब मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीमध्ये राज्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्‍टरांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा आणि उपाययोजना यावर मंथन करण्यात आले. 

सोलापूर : कोरोना संकटात काम करणाऱ्या राज्यातील अठरापेक्षा अधिक वैद्यकीय संघटनांनी डॉक्‍टरांचे संरक्षण व इतर मागण्यांसाठी सुकाणू समिती स्धापन करून लढा उभारण्याची घोषणा केली आहे. 

हेही वाचा : यंदा 19 वर्षांनी आला आश्‍विन अधिक मासाचा योग; शुक्रवारपासून प्रारंभ : पंचांगकर्ते मोहन दाते 

राज्यातील "निमा' आणि "आयएमए' महाराष्ट्र शाखा यांच्या पुढाकाराने नुकतीच वेब मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सध्याच्या कोरोना महामारीमध्ये राज्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्‍टरांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा आणि उपाययोजना यावर मंथन करण्यात आले. या मीटिंगमध्ये राज्यातील सर्व पॅथीच्या डॉक्‍टर्स आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

हेही वाचा : केवळ पोस्टामुळे हुकली "क्‍लास वन'ची संधी; अन्‌ आता आहेत... 

या वेबिनारमध्ये प्राधान्याने पुढील बाबींवर चर्चा होऊन त्यांच्या पूर्ततेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे ठरले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय डॉक्‍टरांबरोबरच सर्व पॅथीच्या खासगी डॉक्‍टर्सना 50 लाखांचे विमा संरक्षण मिळालेच पाहिजे. दुर्दैवाने कोणी डॉक्‍टर कोरोनाबाधित झाला तर त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना प्राधान्याने ट्रिटमेंट, बेड आणि इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. शासनाने निर्धारित केलेले हॉस्पिटल उपचाराचे बिल हे अन्यायकारक आणि न परवडणारे असल्याने त्याचा फेरविचार व्हावा. निवासी डॉक्‍टरांच्या वेतनाचा आणि इतर प्रश्न तातडीने सोडवावेत. पीजी विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत, या मागण्यांवर चर्चा झाली. 

या प्रश्नांच्या त्वरित सोडवणुकीसाठी राज्य पातळीवर एक सर्व पॅथीच्या आणि संघटनांच्या प्रतिनिधींची सुकाणू समिती स्थापन करून त्याच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्रितपणे हा लढा देण्याचे ठरले आहे. या मागण्यांसंदर्भात योग्य पाठपुरावा करून शासनाने योग्य प्रतिसाद न दिल्यास पुढील धोरण सुकाणू समितीच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात येईल. या अतिशय महत्त्वाच्या वेब मीटिंगमध्ये आयएमए, निमा, आयुर्वेद व्यासपीठ, बीजीए, युनानी फोरम, राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेल, व्हीव्हीएम, अस्तित्व परिषद, मासद, हिम्पाम, होमिओपॅथी संघटना, युनानी संघटना, मार्ड, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, एमसीआयएम, महाराष्ट्र होमिओपॅथी कौन्सिल, डेंटल कौन्सिल, आयुष टास्क फोर्स, सर्व कौन्सिलचे सदस्य, आयएमए अंतर्गत इतर स्पेशालिटीच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

याबाबत निमा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर म्हणाले, निमा व आयएमएच्या पुढाकाराने राज्यातील विविध प्रकारच्या डॉक्‍टर संघटनांनी कोरोना उपचारातील डॉक्‍टरांचे प्रश्‍न गांभीर्याने ओळखून उपचारातील संरक्षणाच्या दृष्टीने एकत्र येण्याचे ठरवले आहे. लवकरच राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन होणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors associations in the state will come together and set up a steering committee