शिक्षक नको रे बाबा..! जिल्ह्यातील ५८ डीएड महाविद्यालयांना टाळे; व्यावसायिक शिक्षणाकडे तरूणांचा कल; सध्या २८ महाविद्यालयांमध्ये फक्त ८५० विद्यार्थी

कला, वाणिज्य असो की विज्ञान शाखेतील ९० टक्के गुण मिळालेला विद्यार्थी एकेकाळी ‘डीएड’लाच प्रवेश घ्यायचा. पण, आता विद्यार्थी न मिळाल्याने ११ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ५८ डीएड महाविद्यालयांना टाळे लावावे लागले आहे.
शिक्षक
शिक्षकGoogle

सोलापूर : कला, वाणिज्य असो की विज्ञान शाखेतील ९० टक्के गुण मिळालेला विद्यार्थी एकेकाळी ‘डीएड’लाच प्रवेश घ्यायचा. पण, इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल आणि शिक्षक भरतीस विलंब, पटसंख्येअभावी अतिरिक्तची भीती, अशा विविध कारणांमुळे ‘डीएड’कडील कल कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी न मिळाल्याने ११ वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ५८ डीएड महाविद्यालयांना टाळे लावावे लागले आहे.

इयत्ता बारावीनंतर डीएड करण्यासाठी एकेकाळी अक्षरश: दोन ते अडीच लाखांचे डोनेशन घेतले जात होते. पण, आता अनेक महाविद्यालयात नि:शुल्क प्रवेश असतानादेखील विद्यार्थी मिळत नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात २०१०-११मध्ये तब्बल ८६ अध्यापक महाविद्यालये (डीएड) होती. मात्र, सध्या एकही शासकीय अध्यापक विद्यालय सुरू नसून सहा अनुदानित तर २२ खासगी अध्यापक विद्यालये सुरू आहेत.

अनुदानित महाविद्यालयांमध्ये शुल्क नसल्याने ८० ते ८५ टक्के प्रवेश आहेत. दुसरीकडे मात्र खासगी अध्यापक महाविद्यालयांमध्ये ४० ते ६० टक्के प्रवेश रिक्त आहेत. आगामी काळात त्यातील काही महाविद्यालये बंद होतील, अशी सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील बीएड, एमएड महाविद्यालयांचीही अशीच स्थिती आहे. नोकरीची शाश्वती नाही, वर्षानुवर्षे वाट पाहूनही नोकरी मिळत नसल्याने अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेण्यापेक्षा युवक सध्या स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. त्यासाठी व्यावसायिक शिक्षणाला पसंती देत आहेत. त्यामुळे अध्यापक महाविद्यालयांची अशी विदारक स्थिती झाल्याचे चित्र आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘डीएड’ नाही

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची २०३० पर्यंत अंमलबजावणी होणार आहे. नवीन धोरणानुसार डीएड, बीएड हा इंटिग्रेटेड कोर्स असणार आहे. इयत्ता बारावीनंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला पाच वर्षांत पदवी, पदव्युत्तर पदवीची संधी मिळणार आहे. सध्या डीएड व बीएड महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांची चिंता दूर होईल, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात.

जिल्ह्यातील ‘डीएड’ची सद्य:स्थिती

  • एकूण महाविद्यालये

  • ८६

  • सुरू असलेली महाविद्यालये

  • २८

  • अनुदानित महाविद्यालये

  • एकूण प्रवेश

  • ८५०

पटसंख्येअभावी अनेक डीएड महाविद्यालये बंद

जिल्ह्यात साधारणत: २०१०-११ मध्ये ८६ अध्यापक महाविद्यालये होती, पण आता सहा अनुदानित व २२ खासगी महाविद्यालये सुरू आहेत. पटसंख्येअभावी दिवसेंदिवस अध्यापक महाविद्यालये बंद होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सध्या सुरू असलेल्या महाविद्यालयांना स्वत:मध्ये बदल करून घ्यावा लागणार आहे. त्याचे धोरण लवकरच ठरेल.

- जितेंद्र साळुंखे, प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था (डायट), सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com