एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी एंट्री निश्चित ?

Eknath-Khadse.jpg
Eknath-Khadse.jpg

बीड : राज्यपाल नियुक्त जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांमध्ये राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याच्या दृष्टीने नावांवर खल सुरु असला तरी भाजपचे नाराज आणि मातब्बर नेते एकनाथ खडसे यांचे नावही राष्ट्रवादीच्या यादीत असल्याची खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे. या निमित्ताने त्यांच्या राष्ट्रवादी एंट्रीच्या हालचाली सुरु आहेत. खडसेंची राष्ट्रवादी एंट्री व्हाया विधान परिषद होणार हे निश्चित असल्याचे सांगीतले जात आहे. 

मागच्या महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची विधानसभेलाही उमेदवारी टाळण्यात आली. त्यात त्यांच्या कन्येचाही पराभव झाला. त्यांनी पक्षासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर अनेक वेळा जाहीर नाराजी आणि टिकाही केलेली आहे.

मागच्या महिन्यात विधान परिषदेच्या निवडूण द्यायच्या जागेत त्यांची उमेदवारी कट झाल्यानंतर तर त्यांनी वरच्या पट्टीत भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील यांच्या पक्षातील योगदान आणि सिनीअॉरीटीवरुन राळ उठविली. त्यांनी अनेक वेळा आपले मार्ग खुले असल्याचे सांगून पक्षांतराचे सुतोवाच केले. पक्षासाठी दिलेले योगदान आणि त्यांना मिळत असलेली वागणूक यामुळे खडसे भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. त्यांच्या या अस्वस्थतेला राष्ट्रवादी विधान परिषदेच्या माध्यमातून शांत करणार आहे. त्यातूनच त्यांच्या राष्ट्रवादी एंट्रीचीही पायाभरणी होत असल्याची माहिती आहे.

त्यांची विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा जोराने होते. परंतु, त्यांना भाजपकडून विधान परिषदेची असलेली शेवटची आशाही मावळली आहे. त्यामुळे त्याला आता या विधान परिषदेच्या निमित्ताने वाट मोकळी होणार आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये शिवसेनेला पाच, राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला तीन जागा मिळणार आहेत. एकीकडे पक्षपातळीवर नावे निश्चित केली जात असली तरी दुसरीकडे क्रीडा, कला, सांस्कृतिक, साहित्यीक अशा व्यक्तींसाठी असलेल्या जागांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकीय नावे स्विकारतील का, अशी भीतीही पक्षांना आहे. 

अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीवेळी कायद्यावर बोट ठेवणाऱ्या कोश्यारींच्या पुर्वानुभवामुळे पक्षपातळीवरही ताक फुंकून पिले जात आहे. मधल्या काळात राज्यपालांची जेष्ठ नेते शरद पवारांसह इतर नेत्यांनी घेतलेल्या भेटी याच कारणाने होत्या अशीही माहिती आहे. दरम्यान, या चार जागांमध्ये सर्वच बाजूंनी समतोल साधण्यासाठी राष्ट्रवादीत वरिष्ठ पातळीवर खल सुरु आहे. राजू शेट्टींबरोबरच भाजपला धक्का देण्यासाठी आणि खानदेशात आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने भाजपचे जेष्ठ नाराज नेते एकनाथ खडसे यांचे नाव पुढे आले आहे. चौघांच्या यादीत खडसेंचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. 

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपने बारामतीतून गोपीचंद पडळकर यांना संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीतूनही धनगर समाजाला स्थान देण्याचा विचार पुढे येत बारामतीचे श्री. देवकते यांचे नाव पुढे येत आहे. चौथ्या जागेसाठी मोहळ (जि. सोलापूर) येथील राजन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील दांडगे राजकीय आसामी आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा मतदार संघ राखीव असल्याने त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून संधी देण्याचा विचार पक्षात आहे. राजन पाटील यांच्या नावामुळे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com