
Thackeray vs Shinde : "एकनाथ शिंदेंनी बाप देखील बदलला" ; ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका
राज्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखांची आज महत्वाची बैठक आहे. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. याचा देखील विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे.
विनायक राऊत म्हणाले, "हिंमत असेल तर शिंदे गटाने सनदशीर मार्गाने कमवावे आणि त्यावर मालकी सांगावी. शिवसेनेच्या मालकीवर ताबा मिळवायचा आणि आयत्या बिळात नागोबा व्हायचं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले बाप देखील बदलले. काल-परवा पर्यंत बाळासाहेब ठाकरे त्यांचे पिता होते. आता अमित शाह त्यांना वडिलांसारखे वाटायला लागले आहेत. बाप बदलायाचा, नाव बदलायचं, झेंडा बदलायचा, ताटातील हिसकावून घ्यायचे, अशी बदमाश लोकांची औलाद आहे."
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेसाठीचा संघर्ष सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला हा वाद सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले. पण बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेले दादर इथलं शिवसेना भवन अजूनही उद्धव ठाकरेंकडेच आहे. 'साम'ने दिलेल्या माहितीनुसार, हे शिवसेनेचं मुख्यालय असलं तरी त्याची मालकी पक्षाकडे नाही, तर उद्धव ठाकरेंकडेच आहे. त्यामुळे शिंदे गट त्यावर दावा सांगू शकणार नाही.