कृषी कायद्यांविरोधात कॉंग्रेसचा एल्गार; 15 ऑक्‍टोबरला भव्य शेतकरी बचाव रॅली

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 October 2020

केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत. या काळ्या कायद्यांविरोधात कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून 15 ऑक्‍टोबरला राज्यात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईने तीन शेतकरी कायदे मंजूर केले आहेत. या काळ्या कायद्यांविरोधात कॉंग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून 15 ऑक्‍टोबरला राज्यात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात एकाच वेळी आयोजन केले जाणार आहे. समाजमाध्यमांवरही ही रॅली पाहता येईल, अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली असून, 50 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

दमदार पावसाची हजेरी; मराठवाड्याला पुन्हा तडाखा

केंद्र सरकारने लादलेल्या या काळ्या कायद्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही या विषयावर बैठक झाली. भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर लोकशाही व संसदेचे सर्व नियम पायदळी तुडवून शेतकऱ्यांवर हे कायदे लादले आहेत. उद्योगपतींच्या फायद्यासाठी आणलेल्या या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी उद्‌ध्वस्त होणार असून, शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. असेही गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले.

मंत्रीमंडळ बैठकीकडे 60 हजार शिक्षकांचे लक्ष; थोरात समिती करणार अनुदान निकषात सुधारणा? 

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, खासदार राजीव सातव यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दुसरा कार्यक्रम औरंगाबाद येथे होणार असून, या रॅलीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अमरावती येथील शेतकरी बचाव रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, नागपूरमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसन व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न होणार आहे; तर कोकण विभागातील रॅली महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझ्झफर हुसेन यांच्या उपस्थितीत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्याविरोधात कॉंग्रेसने याआधी 26 सप्टेंबर रोजी- #SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम राबविली होती. या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 2 ऑक्‍टोबर 2020 रोजी राज्यव्यापी किसान मजदूर बचाव दिवस पाळण्यात आला होता. 

राज्यातील 20 हजार शिक्षकांची दिवाळी अंधारात? "शालार्थ'मध्ये नोंदी नसल्याचा परिणाम 

15 ऑक्‍टोबरला संध्याकाळी 4 वाजता शेतकरी बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यातील पाच ठिकाणी असणार आहे. हे सर्व कार्यक्रम एकमेकाशी जोडलेले असणार आहे. पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून कॉंग्रेस नेते राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, 50 लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. 
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री 

-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar of Congress against agricultural laws; Massive Farmers Rescue Rally on 15th October