पंढरपुरातून उद्या महायुतीच्या दूध आंदोलनाचा एल्गार ! 

Milk_Agitation
Milk_Agitation

पंढरपूर (सोलापूर) : दुधाला योग्य दर मिळत नसल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरू आहे. दुधाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी उद्या (1 ऑगस्ट) भाजपसह मित्रपक्षांच्या महायुतीने राज्य सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. दूध दरवाढ आंदोलनाची सुरवात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शनिवारी पंढरपुरातून केली जाणार आहे. उद्या (शनिवारी) सकाळी संत नामदेव पायरीजवळ विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाची सुरवात केली जणार आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी आज दिली. 

मागील आठ दिवसांपूर्वी दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनानंतरही परिस्थिती "जैसे थे'च आहे. त्यानंतर भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांनी दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यामुळे उद्याच्या महायुतीच्या दूध दरवाढ आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

श्री. भोसले म्हणाले, लॉकडाउमुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटकाळात गेल्या चार महिन्यांपासून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू आहे. यामध्ये खासगी व सहकारी दूध संघ मालामाल तर दूध उत्पादक शेतकरी कंगाल अशी परिस्थिती झाली आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर द्यावा, राज्य सरकाने प्रतिलिटर शेतकऱ्यांना दहा रुपयांचे अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी भाजपसह मित्रपक्षांच्या वतीने उद्या राज्यभरात एकाच वेळी सरकार विरोधात आंदोलन केले जाणार आहे. 

या आंदोलनाचे रणशिंग पंढरीतून फुंकले जणार आहे. आंदोलनासाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर आदी येणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्हाभरातून कार्यकर्ते येणार असल्याचेही श्री. भोसले यांनी सांगितले. 

दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे 
दूध दरवाढीसाठी पुकारण्यात आलेल्या उद्याच्या आंदोलनात सर्व दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन केंद्रे आणि दूध संघांनी सहभागी होऊन दूध संकलन व वाहतूक करू नये. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. राज्य सरकारचे दूध प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. सरकारला जागे करण्यासाठी उद्याच्या आंदोलनात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतकरी एकजुटीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन श्री. भोसले यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com