esakal | '...त्याला' वाचविण्यासाठी आदित्य ठाकरेंचे नितीन गडकरी यांना पत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

'त्याला' वाचविण्यासाठी आदित्य ठाकरेंचे नितीन गडकरी यांना पत्र!
  • सागंली जिल्ह्यातील मौजे भोसे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष अडथळा ठरत आहे. मात्र या वटवृक्षाला वाचविण्यासाठी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे.
  • त्याचबरोबर ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. 

'...त्याला' वाचविण्यासाठी आदित्य ठाकरेंचे नितीन गडकरी यांना पत्र!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सागंली जिल्ह्यातील मौजे भोसे येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष अडथळा ठरत आहे. मात्र या वटवृक्षाला वाचविण्यासाठी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. त्याचबरोबर ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? चंद्रकांत पाटील यांनी माझी तसेच सरकारची बदनामी केली; म्हणून...

राज्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार व्यापक कार्य करीत आहे. वृक्षसंवर्धनही त्याअनुषंगाने फार महत्वाचे आहे. सांगली जिल्ह्यातील संबंधीत वटवृक्ष पुरातन असून, त्याचे जतन होणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, आपल्या विभागामार्फत रत्नागिरी - कोल्हापूर - मिरज - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.166 चे काम सुरु आहे. या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. याबद्दल मंत्री ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. मात्र, मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मोजे भोसे (तालुका मिरज, जि.सांगली) या गावातून जातो. भोसे येथील गट क्र. 436 येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून, या मंदिरासमोरच सुमारे चारशे वर्षापूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे 400 चौ.मी. इतका व्यापक आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघुळ आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. 

ही बातमी वाचली का? मालवणी इमारत दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदतीचा हात

मार्ग बदलून वटवृक्षाचे जतन करा 
नियोजित राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या कामात भोसे येथील पुरातन वटवृक्ष अडथळा ठरत असल्याने, तो तोडावे लागेल किंवा पर्यायी जागेवरुन रस्ता करावा लागेल, असे मिरज उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालात नमूद केलेले आहे. मात्र, या वटवृक्षाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तसेच परिसरातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाचा विचार करता भोसे येथील संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती मंत्री ठाकरे यांनी केली आहे.  
------------------------------

(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)