३६५ पैकी दरवर्षी २०० दिवस बंदोबस्ताचीच ड्यूटी! बंदोबस्त, जलद तपासाचे ओझे वाढले; कुटुंबासाठी मिळेना पुरेसा वेळ

सभा, मोर्चा, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे (व्हीआयपी) दौरे याठिकाणी वर्षात सरासरी २०० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे. त्यानंतर गुन्ह्यांचा तपास वेळेत लावणे, रात्रगस्त अशा कारणांमुळे कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची स्थिती आहे.
police
policesakal

सोलापूर : सभा, मोर्चा, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे (व्हीआयपी) दौरे याठिकाणी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी असते. वर्षात सरासरी २०० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे. त्यानंतर आपल्याकडील गुन्ह्यांचा तपास वेळेत लावणे, पुन्हा रात्रगस्ती अशा कारणांमुळे पोलिसांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची स्थिती आहे. बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास आणि कौटुंबिक जबाबदारी, याचा मेळ बसत नसल्याने अनेकजण तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील सत्तासंघर्षामुळे नेत्यांच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात सभा होत आहेत. त्यातच पुन्हा विविध विषयावरून आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासकाम बाजूला ठेवून वारंवार बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. दरम्यान, आता सण-उत्सवाचा काळ असून पुन्हा ऑक्टोबरपासून निवडणुकीचा बंदोबस्त असणार आहे.

दिवाळीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असून एप्रिलनंतर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक होईल. त्यावेळी देखील पोलिसांना सतत बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे. त्यामुळे पोलिस अंमलदारांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देत येईना, अशी स्थिती आहे. कोरोना काळात त्याचा अनुभव सर्वांनाच आला. सद्य:स्थितीत अंमलदारांना बऱ्याचदा हक्काच्या सुट्या देखील घ्यायला अडचणी निर्माण होत आहेत.

अंदाजे ३० टक्के अंमलदारांना बीपी, शुगर

सोलापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अंदाजे ३० टक्के पोलिस अंमलदार व अधिकाऱ्यांना मधुमेह (शुगर) व उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे चित्र आहे. अनेकांना वेळेत त्याची माहिती देखील होत नाही. राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असून गृह विभागाने पोलिस अधिकारी व अंमलदारांची संपूर्ण रिक्त पदे भरण्याची आवश्यकता असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या ४० वर्षांवरील अंमलदारांना वर्षातून दोनवेळा आरोग्य तपासणीसाठी पाच हजार रुपये मिळतात, तर ४० वर्षांखालील अंमलदारांना वर्षातून एकदाच तेवढी रक्कम मिळते. त्यात वाढ करणे काळाची गरज आहे.

पोलिसांची अजूनही २० हजार पदे रिक्तच

गृह विभागाने काही दिवसांपूर्वी १९ हजार पोलिस अंमलदारांची भरती केली. त्यांचे सध्या प्रशिक्षण सुरु असून ते सेवेत दाखल व्हायला अजून १० महिने लागणार आहेत. दुसरीकडे अद्याप गृह विभागाकडे १६ ते २० हजार पदे रिक्त आहेत, पण प्रशिक्षणाची सोय नसल्याने त्यांची भरती पुढील टप्प्यात होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अनेक शहरांचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, मात्र मनुष्यबळ व पोलिस ठाणी तेवढीच आहेत. त्यामळे एका गुन्ह्यांचा तपास पूर्ण होण्यापूर्वी लगेचच दुसरा गुन्हा त्यांच्याकडे सोपविला जातोय, अशी वस्तुस्थिती आहे.

पोलिस बलाची सद्य:स्थिती

  • पोलिसांची रिक्तपदे

  • १६ ते २० हजार

  • वर्षातील सरासरी बंदोबस्त

  • २०० दिवस

  • आठवड्यात अंमलदारांकडे गुन्हे

  • अंदाजे ८ ते १०

  • बीपी, शुगर असणारे अंमलदार

  • अंदाजे ३० टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com