पाचवी व आठवीतील अनुत्तीर्णची १५ जूनपूर्वीच परीक्षा! उन्हाळा सुटीत होणार जादा तास,‌ फेरपरीक्षा टाळण्यासाठी सगळेच पास; वाचायला, आकडेमोड न येणारेही पुढच्या वर्गात

इयत्ता पाचवी-आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १५ जूनपूर्वी फेरपरीक्षा होणार असून विषय शिक्षकांना उन्हाळा सुटीतही जादा तास घ्यावे लागतील. मात्र काही शाळांनी लिहायला, वाचायला विशेषतः इंग्रजी येत नाही, आकडेमोड जमत नाही अशा विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण केल्याची चर्चा आहे.
solapur
solapursakal

सोलापूर : इयत्ता पाचवी व आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १५ जूनपूर्वी फेरपरीक्षा होणार असून त्यासाठी विषय शिक्षकांना उन्हाळा सुटीतही जादा तास घ्यावे लागतील. मात्र, काही शाळांनी लिहायला, वाचायला विशेषतः इंग्रजी येत नाही, आकडेमोड जमत नाही अशा विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही बाब पडताळायची कशी याचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘आरटीई’ ॲक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे २०१० पासून आतापर्यंत एकही विद्यार्थी नापास झाला नाही. पण, पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी-बारावीत पिछाडीवर राहिले आणि अनेकांनी मधूनच शाळा देखील सोडली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद झाली आहे. शाळांनी घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन किंवा त्यांचे जादा तास घेऊन पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी त्यांची फेरपरीक्षा घ्यायची आहे.

२ मेपासून शाळांना उन्हाळा सुटी लागणार आहे, पण या पाचवी व आठवीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जादा तास घ्यावे लागणार आहेत. त्यांची परीक्षाही सुटीच्याच काळात घ्यावी लागणार असून सुटीत वाढणारे काम टाळण्याच्या हेतूने काहींनी सर्वच विद्यार्थ्यांना पास केल्याची चर्चा आहे. उत्तरपत्रिकांमध्ये तर तो विद्यार्थी पास होण्याएवढे गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे, मग त्याची गुणवत्ता तपासायची कशी, हा प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे काही शाळांनी मात्र अभ्यासात पिछाडीवर असलेल्या विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठपणे गुण दिले आहेत.

सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे आवाहन...

  • इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेसाठी शाळा स्तरावर (मुख्याध्यापक संघाचे) घेतलेल्या पेपरचे गुण उत्तीर्ण-अनुत्तीर्णसाठी घेता येतील.

  • इयत्ता पाचवी, आठवीसाठी सवलतीचे गुण १० असून एका विषयाला जास्तीत जास्त ५ गुण देता येतील. सवलतीचे गुण फक्त तीन विषयांसाठी असणार आहेत.

  • पाचवी व आठवीचा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यास अतिरिक्त मार्गदर्शनाचे वेळापत्रक व पुनर्परीक्षेची तारीख निकालाच्या दिवशीच द्यावी.

  • पुनर्परीक्षा पुढील वर्षाची शाळा सुरू होण्यापूर्वी १५ जूनपूर्वीच घ्यावी. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास तो विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात राहील.

तक्रार केल्यास निश्चितपणे होईल पडताळणी

अभ्यासात खूपच पिछाडीवर असलेल्या पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यास वाढीव गुण देऊन पुढच्या वर्गात ढकलणे योग्य होणार नाही. प्रत्येक शाळांनी पारदर्शकपणे गुणदान करणे अपेक्षित आहे. तरीपण, अभ्यासात पिछाडीवर असलेल्या विद्यार्थ्यास उत्तीर्ण केल्याची कोणी तक्रार केल्यास त्याअनुषंगाने पडताळणी केली जाईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

  • पाचवीचे विद्यार्थी

  • ७१,४५१

  • आठवीचे विद्यार्थी

  • ७०,५०३

  • एकूण

  • १,४१,९५४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com