सावधान! अजित पवारांबाबत पेरल्या जात आहेत बातम्या

NCP-Ajit-Pawar
NCP-Ajit-Pawar

महिनाभरापासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तांतरामध्ये एक नाव शेवटच्या काही दिवसांमध्ये वारंवार चर्चेत राहिले. त्या नेत्याची भूमिका योग्य की अयोग्य? याविषयी माध्यमांत बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. मात्र, समाज माध्यमांतही या नेत्याची चर्चा झाली. ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार.

अजित पवार हे आपल्या चंचल स्वभावामुळे ओळखले जातात. अचानक नाराज होणं, चालू बैठकीतून तडक निघून जाणं या प्रकारचे त्यांचे वर्तन सर्वांनाच माहित आहे. मात्र, प्रशासनावरील त्यांचा वचक आणि काम करण्याची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावरही अजित पवार कायम राहिले आहेत. 

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या सत्तांतराच्या घडामोडींमुळे त्यांच्याविषयीचे मत बदलल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार आमची कामं करतात, निधी मिळवून देतात अशा प्रकारच्या त्यांच्या समर्थनार्थ बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जात असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

या समर्थकांमध्ये शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे आघाडीवर आहेत. अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर मेटे अजित पवारांच्या ख्यालीखुशालीसाठी आले होते. मेटेंची अशी कोणती कामे अजित पवारांनी केली, ज्यामुळे ते विचारपूस करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

राष्ट्रवादी हा गुंड लोकांचा पक्ष आहे, अशी प्रतिमा निर्माण होण्यात अजित पवारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी बंड केल्यामुळे पक्षाची ही प्रतिमा सुधारण्याची आयतीच संधी निर्माण झाली होती. मात्र, भाजपला गुंगारा देत अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले. त्यामुळे आता जर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे तातडीने पुनर्वसन केले, तर हे सगळं पवारांनीच घडवून आणलं, हा समज बळकट होण्यास वाव राहिल. त्यामुळे पवारांना ते हवंय का? असा युक्तिवादही करण्यात येत आहे. 

तसेच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बहिण-भावाचे नाते आणि शरद पवार आणि त्यांच्यातील काका-पुतण्याच्या नात्याशी आणि त्यांच्या प्रेमाशी जनतेचा काय संबंध आहे? एका रात्रीत पक्ष सोडून जाणाऱ्या आणि दुसरा दिवस उगवतोच तोपर्यंत शपथविधी करणारा, तसेच पक्षाच्या कागदपत्रांचा गैरवापर करणारा माणूस जर पक्षाला चालत असेल, तर यामुळे पक्षाबद्दलचे गैरसमज निर्माण होण्याचीच शक्यता जास्त आहे.

तर दुसरीकडे, दीर्घकाळापासून अविश्वासाच्या गर्तेत हेलकावे खाणाऱ्या शरद पवारांना कधी नव्हे ती विश्वासार्हता मिळाली आहे. त्यामुळे ती विश्वासार्हता त्यांनी अजित पवारांच्या टगेगिरीच्या राजकारणाला भिऊन वाया घालवू नये. अजित पवार हे काल पक्ष सोडून गेले होते, उद्याही जातील. मात्र, जे निष्ठेने पक्षसेवा करत राहिले आहेत, त्यांना शिक्षा कशाला? अशी चर्चाही सध्या जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com