
तात्या लांडगे
सोलापूर : जिल्ह्यात चालू महिन्यात १३ सप्टेंबरपर्यंत अंदाजे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे सुमारे ७४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. तर ऑगस्टमध्ये ५६ हजार ९०० हेक्टरवरील ६८ कोटींचे नुकसान झाले आहे.
२४ तासांत ६५ मिलिमीटर पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. दुसरीकडे सलग पाच दिवस सरासरी १० मिलिमीटर पाऊस हा सततचा पाऊस धरला जातो. दोन्ही पावसामुळे नुकसान झालेल्यांना सरकारकडून भरपाई दिली जाते. सलग चार दिवस ४० ते ५० मिलिमीटर पाऊस पडला आणि पाचव्या दिवशी १० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला तरी तेथे भरपाई मिळत नाही. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे. दरम्यान, पंचनामे होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर केला असला तरी भरपाईसाठी आता नवा निकष आला आहे. पाऊस पडण्यापूर्वीची पिकांची घनता व हिरवळ आणि पाऊस पडून १५ दिवस झाल्यानंतर १५ दिवसांनी पिकांची घनता व हिरवळ सॅटेलाईटद्वारे मोजली जाते. त्यानंतरच आता नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसमोर ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न
अतिवृष्टीचा सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, कांदा, कलिंगड, तूर, उडीद यासह पपई, डाळिंब, केळी अशा फळबागांना मोठा फटका बसला आहे. मात्र, सरकारकडून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज भरण्याच्या नोटिसा बजावल्या असून अनेकांच्या डोक्यावर खासगी सावकारांच्या कर्जाचाही डोंगर आहे. त्यामुळे आता ‘जगावे की मरावे’ असा प्रश्न बळिराजा विचारू लागला आहे.
जिल्ह्यातील ‘या’ १० मंडलांमध्ये अतिवृष्टी
११ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील शेळगी, मार्डी, बोरामणी, वळसंग, होटगी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी, सोनंद, अक्कलकोट, जेऊर, तडवळ या १३ महसूल मंडलात अतिवृष्टी झाली होती. याशिवाय त्या दिवशी नरखेड, करजगी, दुधनी, निंबर्गी, मुस्ती या मंडळात देखील मोठा पाऊस झाला. दुसरीकडे शनिवारी (ता. १३) निंबर्गी, पांगरी, नारी, तडवळ, रोपळे, जेऊर, कोर्टी, उमरड, केत्तूर व हुलजंती या १० मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याशिवाय तिऱ्हे, वळसंग, विंचूर, बार्शी, आगळगाव, उपळाई, गौडगाव, पानगाव, अक्कलकोट, चपळगाव, पेनूर, टेंभुर्णी, करमाळा, अर्जुननगर, केम, सालसे, आंधळगाव या मंडलांमध्ये देखील मोठा पाऊस झाला आहे.
भरपाई लवकरच मिळेल
सोलापूर जिल्ह्यात ११ सप्टेंबरला १३ तर १३ सप्टेंबरला १० महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये ६८ कोटी रुपयांचे (५६ हजार ९०० हेक्टर) तर सप्टेंबरमध्ये अंदाजे ६५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ऑगस्टचे पंचनामे पूर्ण होऊन अहवाल शासनाला सादर केला असून सप्टेंबरचे पंचनामे सुरू आहेत.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सात तालुक्यांना सर्वाधिक फटका
परतीच्या पावसाने जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व बार्शी या तालुक्यांना सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. १ ऑगस्ट व १३ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एक लाख १६ हजार ९०० हेक्टरवरील पिकांचे अंदाजे १४२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.