स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावला, पवारांनी गणपतरावांना वाहिली श्रद्धांजली

स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावला, पवारांनी गणपतरावांना वाहिली श्रद्धांजली

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. गणपतराव देशमुख यांना संपूर्ण राज्यात आबा या नावाने संबोधलं जायचं. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारा नेता अशीही त्यांची ओळख होती. गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारात मोठी दरी निर्माण झाली आहे. सर्वच स्तरातून त्यांना श्रद्दांजली अर्पण केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, अशा शब्दांत शरद पवार यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावला, पवारांनी गणपतरावांना वाहिली श्रद्धांजली
"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"

गणपतराव देशमुख यांचा जीवनप्रवास

संपूर्ण नाव : गणपतराव अण्णासाहेब देशमुख

जन्म : 10 ऑगस्ट 1927

जन्मठिकाण : पिंपरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे आजोळी

शिक्षण : बी. ए. एलएल. बी.

पक्ष : भारतीय शेतकरी कामगार पक्ष

मतदार संघ : 253, सांगोला विधानसभा मतदार संघ

इतर माहिती...

1950 - 54 : शेकाप पुरस्कृत विद्यार्थी सभेचे कार्यकर्ता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग

1962 : विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रथमच भाई गणपतराव देशमुख यांना तिकीट मिळाले.

1962 : शेकापकडुन गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवुन कॉंग्रेसच्या केशवराव राऊत यांचा 2057 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश

1965 : अन्नधान्य चळवळीत येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध

1967 : विधानसभेच्या निवडणुकीत काकासाहेब साळुंखे यांचा 672 मतांनी पराभव केला.

1969-75 : सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शेतकरी सभा.

1972 : कॉंग्रेसचे काकासाहेब साळुंखे-पाटील व 1995 मध्ये शहाजी पाटील यांच्याकडून पराभव

15 मे 1969 : सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना

1972 ते 1975 : काळात रस्ते वाहतूक मंडळाचे सदस्य.

1975 : आणीबाणीच्या काळात खटला व तुरुंगवास.

1977 : विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा.

1980 ते 1982 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख

1990 व 2004 : काळात दोन वेळा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम पाहिले.

9 नोव्हेंबर 2009 : महाराष्ट्राचे राज्यपालांकडून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

1978 ते 1980 : शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये गणपतराव देशमुख कृषी, ग्रामीण विकास, विधी व न्याय खात्याचे मंत्री होते.

1999 ते 2002 : आघाडी सरकारमध्ये ते पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री

3 ऑगस्ट 2012 : शेकापला 65 वर्षे पूर्ण झाली. याच वर्षी आबासाहेबांच्या आमदारकीच्या कारकीर्दीला विधिमंडळात पन्नास वर्षे पूर्ण झाली.

2019 : विधानसभा निवडणुक न लढविता नातु डॉ. अनिकेत देशमुख यांना शेकापकडुन उमेदवारी.

मिळालेले पुरस्कार...

नवी दिल्ली : बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया.

2003 : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

2004 : सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार मिळाला.

2007 : गांधी फोरम संघटना दिल्लीचा 'आदर्श समाजसेवक पुरस्कार' मिळाला.

29 जून 2009 : महाराष्ट्र शासनातर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला.

2010 : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या. मुंबई यांच्या वतीने 'वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार'

30 मार्च 2014 : 'रयत माउली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार'.

26 एप्रिल 2017 : भारती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने'जीवनसाधना गौरव पुरस्कार'.

2 डिसेंबर 2018 : अग्निपंख फाउंडेशनतर्फे 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार'.

13 नोव्हेंबर 2020 : किसन वीर सहकारी साखर कारखाना, सातारा यांच्या वतीने 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com