समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या; भाजप नेत्याची मागणी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

सुुरवातीला स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या महामार्गाला देण्यात यावे, अशी मागणी भाजपने लावून धरली होती.​

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही राजधान्या एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरवातीपासूनच कायम चर्चेत राहिला आहे. या महामार्गाला कोणाचं नाव द्यायचं यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कुरघोडी सुरू आहेत. भाजपच्या एका आमदाराने समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार गणपत गायकवाड असे या आमदाराचे नाव आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. 

या पत्रात आमदार गायकवाड यांनी असे नमूद केले आहे की, भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग मुख्य मानबिंदू ठरणारा आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर दादरमधील चैत्यभूमी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. 

- हैदराबाद चकमक प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी?

चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही दोन्ही स्थळे बहुजन समाजाच्या श्रद्धेची ठिकाणे असून या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी देशाभरातून हजारो लोक येत असतात. आणि समृद्धी महामार्ग हा 10 जिल्हे, 30 तालुके आणि 356 गावांतून जात असल्यामुळे या महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, असे या निवेदन पत्रात म्हटले आहे. 

समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग आराखड्यापासून कायम चर्चेत राहिला आहे. महामार्गाचे कामकाज सध्या संथ गतीने सुरू असले तरी या महामार्गाला कोणाचे नाव देण्यात यावे, याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. 

- स्पृहाला गेल्या काही महिन्यांपासून सतावतेय 'ही' भीती...

सुुरवातीला स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या महामार्गाला देण्यात यावे, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. त्यावेळी तत्कालिन मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाला महाराष्ट्रातील एखाद्या नेत्याचे नाव देण्यात यावे, असा सूर आवळला होता. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पसंती दर्शविली होती. त्यानंतर या महामार्गाच्या नावावरून कोणताही वाद उपस्थित होऊ नये, यासाठी नाव अगोदरच निश्चित करण्यात आल्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. 

- आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात

परंतु सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी सरकारने या महामार्गाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. याची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता असताना आता भाजप आमदाराने केलेल्या नवा मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give name of Dr Babasaheb Ambedkar to Samriddhi Highway demanded by BJP MLA