Medical Courses Admission: ‘सीईटी-सेल’च्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घोळात घोळ; विद्यार्थ्यांची दमछाक

CET सेल
CET सेलsakal media

Medical Courses Admission : इतर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया होऊन पहिले सत्र आटोपले. मात्र ‘सीईटी- सेल’च्या गोंधळामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया चांगलीच लांबली आहे. सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ग्रुप ‘बी’च्या प्रवेश प्रक्रियेत चौथ्या व पाचव्या ‘स्ट्रे व्हॅकन्सी’ राउंडची प्रक्रिया सुरू असून, शनिवारी (ता. २५) यादी जाहीर होईल.

प्रवेशासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, त्यापैकी दोन दिवस बँका बंद आहेत. अशात बँकेतून डीडी काढण्यासाठी एकच दिवस हातात आहे. विद्यार्थ्याला दूरचे महाविद्यालय मिळाले, तर ॲडमिशन कशी घेणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Glitch in CET CELL medical admission process news)

उच्चशिक्षणाचे त्यातही वैद्यकीय अभ्यासक्रमात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यातील सीईटी-सेल शिक्षण सुरू होण्याआधीच ‘परीक्षा’ घेत आहे. एक तर अभियांत्रिकी, औषधशास्त्र निर्माणशास्त्र व अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचे पहिले सत्र संपायला आले. तरीही ‘सीईटी- सेल’च्या घोळामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक लांबत चालली असून क्लिष्टही होत आहे.

सहा महिने घालवले

जुलैमध्ये ‘नीट’चा निकाल लागल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरीही वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विविध शाखांची प्रवेश प्रक्रिया संपलेली नाही. पैकी केवळ एमबीबीएस, बीडीएसचे प्रवेश दोन आठवड्यांपूर्वी आटोपले. सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील ग्रुप ‘बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस या शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेत ‘सीईटी- सेल’ने सहा महिने घालवून दिलेत.

सध्याची स्थिती अशी

या प्रक्रियेत स्ट्रे व्हॅकन्सीच्या चौथ्या, पाचव्या राउंडची नोटीस २२ नोव्हेंबरला आली. त्यात बीएएमएसच्या दोन नवीन महाविद्यालयांसह बीएचएमएसच्या इन्स्टिट्यूशनल कोट्यातील उर्वरित जागा जिथे आहेत, त्या महाविद्यालयांचे ऑप्शन २३ तारखेच्या दुपारी बारापर्यंतच भरायचे होते. मात्र २३ तारखेच्या सकाळी दहापर्यंत ‘सीईटी- सेल’च्या साइटवर तांत्रिक अडचणीमुळे ऑप्शन भरले जात नव्हते. दहा वाजता ती सुरू होऊन विद्यार्थ्यांनी कसेबसे दुपारी बारापर्यंत ऑप्शन भरले.

CET सेल
Medical Hospital : भरती व्हायचंय... फॅन घरून आणा!

नोटिशीत पुन्हा बदल

याच नोटिशीत २३ तारखेच्या मध्यरात्रीनंतर बदल होऊन सुधारित नोटीस आली. त्यानुसार २४ तारखेस दुपारी १२ ते ८ पर्यंत नवीन बीएएमसएस महाविद्यालय व बीएचएमएसच्या उर्वरित जागांची महाविद्यालये ऑप्शन म्हणून ‘स्ट्रे व्हॅकन्सी’ राउंड-३ मध्ये भरलेल्या महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रम यादीत (प्रेफरन्स लिस्ट) समाविष्ट करता येणार आहे.

वेळापत्रकामुळे होणार दमछाक

या नोटिशीनुसार विद्यार्थ्यांना आज ऑप्शन समाविष्ट करायचे आहेत. २५ नोव्हेंबरला कुणाला कोणते महाविद्यालय मिळाले, त्याची यादी जाहीर होईल. प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यायची मुदत २८ नोव्हेंबर सायंकाळी साडेपाचपर्यंत आहे. प्रवेश घेण्यासाठी तीन दिवस मिळत असले तरी त्यापैकी २५ला चौथा शनिवार, २६ ला रविवार व २७ ला सोमवारी गुरुनानक जयंती अशा सलग तीन दिवस बँकांना सुट्या आहेत.

अशा स्थितीत विद्यार्थी, त्यांच्या पालकांनी कॉलेज शुल्काचा ‘डीडी’ कसा व कधी काढायचा? २८ नोव्हेंबरला तो काढायचे ठरवले, मात्र महाविद्यालय दूरवरच्या गावचे असेल, तर त्याठिकाणी कसे पोचायचे? त्यासाठी चेकचा ऑप्शन असला तरी सुटीच्या दिवशी चेक देऊन, बँक सुरू राहील त्या दुसऱ्याच दिवशी डीडी सादर करून चेक परत घ्यायचा आहे. अशा विचित्र शेड्यूलमुळे विद्यार्थ्यांसह पालकांचीही चांगलीच दमछाक होत आहे.

CET सेल
JEE NEET Exam: अनुसूचित जातीच्‍या विद्यार्थ्यांना जेईई, नीटसाठी मिळणार अर्थसहाय्य; सोमवारपर्यंत मुदत

ऑप्शन भरण्यासाठी हवी संधी

मुळात सध्या या प्रक्रियेत स्ट्रे व्हॅकन्सी राउंड- ४ व ५ सुरू आहे. या राउंडसाठी सूचना काढताना ‘सीईटी- सेल’ने आधी तिसऱ्या राउंडनंतर कोणत्या महाविद्यालयांमध्ये किती जागा शिल्लक आहेत, त्याची यादी (सीट मॅट्रिक्स) जाहीर करणे व त्याआधारे विद्यार्थ्यांना पुन्हा ऑप्शन भरण्याची संधी देणे गरजेचे होते.

तसेच चौथ्या राउंडची प्रक्रिया पूर्ण करूनही तशी संधी किंवा ‘स्पॉट राउंड’ होणे आवश्‍यक होते. मात्र, ‘सीईटी- सेल’ने तिसऱ्या स्ट्रे व्हॅकन्सी राउंडसाठी भरलेल्या ऑप्शनच्याच आधारे पुढच्या चौथ्या व पाचव्या राउंडची प्रक्रिया रेटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय व उच्चशिक्षण विभागाची जबाबदारी

वैद्यकीय शिक्षण विभाग व उच्चशिक्षण विभाग या दोघांनी समन्वय साधून या क्लिष्ट प्रक्रियेतून मार्ग काढून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची गरज आहे. एकतर या प्रक्रियेत सध्या सुरू असलेल्या स्ट्रे व्हॅकन्सी राउंड ४ व ५चे सुधारित वेळापत्रक जाहीर करून बँकांच्या सुटीचे दिवस वगळता शेड्यूल जाहीर करावे. तसेच सध्या कोणत्याही महाविद्यालयात किती जागा शिल्लक आहेत, त्याची यादी (सीट मॅट्रिक्स) जाहीर करून विद्यार्थ्यांना ऑप्शन भरण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

CET सेल
Medical Course : राज्यातील वैद्यकीयच्या १००० जागा वाढल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com