सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये शासकीय मेगाभरती! पोलिसांसह ७८ हजार पदांची होणार भरती

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने तब्बल ७८ हजार २५७ पदांची भरती करण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यात गृह विभागातील सात हजार २३१ पदांचाही समावेश असून भरती प्रक्रिया साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरु होईल.
Shinde Government
Shinde Governmentesakal

सोलापूर : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने तब्बल ७८ हजार २५७ पदांची भरती करण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यासंदर्भात सोमवारी (ता. २९) सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. गृह विभागातील सात हजार २३१ पदांचाही त्यात समावेश असून ही भरती प्रक्रिया साधारणत: १५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली.

राज्य सरकारच्या एकूण २९ प्रमुख विभागाअंतर्गत तब्बल सव्वादोन लाख पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून १०० टक्के पदांची पुढील दोन महिन्यांत भरती होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी १५ दिवसांत आयोगाकडे मागणीपत्रे पाठवावीत, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यातून जवळपास ११ हजार २६ पदांची भरती होईल. दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाच्या विभागांमधील रिक्त पदांची संख्या वाढल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची संख्या कमी झाल्याने पोलिस यंत्रणांवरील ताणदेखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील दीड ते दोन महिन्यांत सरकारकडून ६७ हजार २३१ पदांची भरती होईल, असेही वरिष्ठ सूत्रांनी यावेळी सांगितले. पावसाळी अधिवेशात विधानपरिषदेत बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी राज्याच्या शासकीय विभागामधील रिक्त पदांची माहिती देत असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकार ७५ हजार पदांची भरती करेल, असे स्पष्ट केले होते. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांची सात हजार २३१ पदांची भरती लवकरच होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार आता मेगाभरतीचे नियोजन युध्दपातळीवर सुरु झाले आहे.

मेगाभरतीचे संभाव्य नियोजन…

  • पोलिस पदभरती

  • ७२३१

  • ‘एमपीएससी’मार्फत भरती

  • ११,०२६

  • गट ‘ब, क व ड’ची पदभरती

  • ६०,०००

  • भरती प्रक्रियेला सुरवात

  • १५ सप्टेंबरनंतर

डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा

राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा दिवाळीत होण्याची दाट शक्यता आहे. शासकीय पदभरतीची साडेपाच-सहा वर्षांपासून वाट पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून मेगाभरतीचे युध्दपातळीवर नियोजन सुरु आहे. कृषी, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन, गृह, राज्य उत्पादन शुल्क, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास या विभागांसह जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांमधील रिक्तपदांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे डिसेंबरनंतर २५ ते ५० हजार पदभरतीचा दुसरा टप्पा जाहीर होऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com